आळते / वार्ताहर संतांच्या सानिध्यात देवांचे वास्तव्य असते. कुंन्थुगिरी व रामलिंग परिसरासह सर्व धार्मिक स्थळांचा विकास करण्याची जबाबदारी सदैव शासनाची आहे. तसेच पुरातन रामलिंग मंदिरासाठी जाणाऱ्या रस्त्यासाठी पन्नास लाखाचा निधी देणार असल्याची ग्वाही यांनी दिली. आळते (ता. हातकणंगले) येथील श्री. कुंन्थुगिरी क्षेत्राच्या दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. ग.ग. कुंन्थुसागर महाराज यांनी सांगितले, कुंन्थुगिरी क्षेत्र सर्वांचे आहे. प्रत्येकाने येऊन लाभ घ्यावा. आचार्य व मुनी यांना काहीही स्वार्थ नसतो. हे क्षेत्र कुणीही बनवले तरी इथून पुढे शेकडो वर्ष चांगले आचार , विचार , आणि संस्कार देण्याचे कार्य सुरू राहील. पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले , विकास कामातून निसर्गाचे संवर्धन झाले पाहिजे. तसेच महिलांसह व सर्वांना निसर्गातून रोजगार मिळाला पाहिजे. शासनाच्या माध्यमातून सदैव लोकहिताची विकास कामे केली जातील . खास. धैर्यशील माने म्हणाले , सद्पुरुषांच्या पदस्पर्शाने कुंन्थुगिरी क्षेत्र जगभर प्रसिद्ध झाले आहे. कुंन्थुसागर महाराजांसारखे संत , महात्मे पाठीशी असणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रासाठी भरीव निधी देऊन विकास केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यकाळात राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी निश्चित येतील . अशी ग्वाही दिली.
श्री. कुंन्थुगिरी क्षेत्रावरील विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना पालकमंत्री केसरकर , खास . धैर्यशील माने व अन्य मान्यवर …
यावेळी आम. प्रकाश आवाडे यांनी रामलिंग , धुळोबा , अलंमप्रभु , कुंथुगिरी व बालाजीसह सर्व देवस्थानांचा आढावा घेऊन विकास कामे करण्याची मागणी केली. आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी आळते येथील धार्मिक स्थळासह पंचक्रोशीतील विविध समस्या सांगून विकास कामासाठी निधीची मागणी केली. कार्यक्रमास जि. प. सदस्य अरुणराव इंगवले , शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने , तीर्थक्षेत्राचे विश्वस्त कुंतीलाल पाटणी, तहसीलदार कल्पना ढवळे -भंडारे , गटविकास अधिकारी शबाना मोकाशी , आळतेचे उपसरपंच अमित पाटील , माजी सरपंच माणिक संकाण्णा , शांतिनाथ संकाण्णा , सुरेश मोघे , शितल बुरसे (महाराज ) यांच्यासह मान्यवर उपस्थित स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचलन रवींद्र देवमोरे यांनी केले . तर आभार तीर्थक्षेत्राचे मुख्याधिकारी सुधीर पाटील यांनी केले .
पंचगंगा नदीसाठी २९० कोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा मानस आहे. त्यासाठी २९० कोटीचा मास्टर प्लॅन बनविला असून त्या संदर्भात लवकरच बैठक होऊन काम सुरू होणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले .