जिल्हा परिषदेच्या शाळा स्वयंपूर्ण होण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वपुर्ण- प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

कोल्हापूर :
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून शिष्यवृती, एन.एम.एम.एस. (NMMS), शैक्षणिक प्रतवारी निर्देशांक (PGI) अशा स्पर्धा परीक्षा व मूल्यमापनामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेसह भौतिक सुविधांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी समाजातील दातृत्ववान व्यक्ती, संस्था यांचा सक्रीय सहभाग महत्वपूर्ण आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी व्यक्त केले.

दि. कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया (CFOI) संस्थेमार्फत आयोजित राधानगरी तालुक्यातील वि.मं. बुजवडे, वि.मं. मोघर्डे, वि.मं. कासारपुतळे या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटर्स व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी श्रीमती शेंडकर यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करुन अभ्यास कसा करावा, व्यक्तीमत्व विकास याबाबत विविध उदाहरणांसह मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचा उत्साह व्दिगुणित केला.

दि. कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत प्राची शेठ खेताणी यांच्यावतीने गेली सहा वर्ष सातत्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्ज, स्वेटर्स, शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप तसेच निराधार महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण केले जात असून याकामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. तसेच यापुढेही जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मानस असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी व्यक्त केले.

दि. कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया मार्फत आजरा तालुक्यातील 20 शाळा, भुदरगड तालुक्यातील 29 शाळा, चंदगड तालुक्यातील 12 शाळा, गडहिंग्लज तालुक्यातील 16 शाळा, गगनबावडा तालुक्यातील 13 शाळा, हातकणंगले तालुक्यातील 5 शाळा, कागल तालुक्यातील 18 शाळा, करवीर तालुक्यातील 9 शाळा, पन्हाळा तालुक्यातील 10 शाळा, राधानगरी तालुक्यातील 28 शाळा, शाहूवाडी तालुक्यातील 15 शाळा व शिरोळ तालुक्यातील 7 शाळेतील एकूण 4894 विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!