पक्षकार व दस्त लेखनिक यांच्या पुर्व परवानगीशिवाय दस्तांच्या नक्कला देवु नयेत 

 दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटनेची मागणी

हातकणंगले /प्रतिनिधी    

             जनहित माहिती अधिकार कायद्यान्वये मागणी करण्यात येणा-या दस्तांच्या नक्कला संबंधीत पक्षकार व दस्त लेखनिक यांना पुर्व कल्पना देवुन नक्कल देणेत  यावी. यासह अन्य मागण्यांचे निवेदन हातकणंगले दस्त लेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटनेने दुय्यम निबंधक दिलीपकुमार काळे यांना दिले.

         संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की , हातकणंगले दुय्यम निबंधक  कार्यालयांमध्ये स्थावर मिळकती बाबतचे विविध प्रकारचे दस्तऐवज व त्यास आवश्यक असणा-या सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन नोंदविले जातात. त्याकामी सदर कार्यालयात दररोज अनेक गावच्या अनेक पक्षकारांची आपआपल्या कामासाठी वर्दळ असते. सदरचे दस्त हे आपल्या कार्यालयामध्ये नोंदणी करुन घेतले जातात. दस्तऐवज ऑनलाईन प्रणालीला जोडले असलेने दस्तऐवज बाहेर ऑनलाईन प्रणालीमध्ये दिसतात. हि जनहितार्थ सेवा अत्यंत लाभदायक व निशुल्क आहे.

        परंतु या ऑनलाईन प्रणालीचा काही विघ्न संतोषी लोक हे आर्थिक स्वार्थ साधण्याकामी गैरफायदा घेण्याच्या हेतुने माहिती अधिकाराखाली दस्ताची नक्कल  प्राप्त करुन संबंधीत दस्तातील पक्षकारांना परस्पर संपर्क साधुन तुम्ही केलेला दस्तऐवज हा बेकायदेशीर आहे. त्याकामी तक्रार होवुन कोणतेही फेरफार होणार नाहीत. अशी संबंधीत पक्षकारांना भिती घालुन त्यांचेकडून पैशाची मागणी करुन आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. तशी जनमानसात चर्चा सुरु आहे.

      माहिती अधिकारात माहिती मागवुन त्या माहितीच्या आधारे जनहित न पाहता वैयक्तिक  स्वार्थ साधला जातो. त्याचा आर्थिक गैरफायदा घेतला जातो. हि बाब जनहितास धरुन नाही. तरी अश्या परिस्थितीमध्ये आपले कार्यालयाकडे वेळोवेळी माहिती अधिकारात आलेल्या दस्तांची मागणी केली जाते. अशा नक्कला संबंधीत पक्षकार व दस्त लेखनिक यांना पूर्व सुचना देवुन संबंधीत माहिती अधिकारात मागणी केलेल्या दस्तांची माहिती म्हणजेच नक्कल मागणी करणा-या अर्जदारास देणेत याव्यात. अशी सुचना वजा विनंती संघटनेने  केली आहे.

        तसेच आपल्या कार्यालयात नोंदणी करण्यात येणारे विविध प्रकारचे दस्तऐवज हे अधिकृत परवाना धारक तसेच वकील अथवा अधिकृत परवानाधारक यांचेकडूनच लिहून अथवा टंकलिखित केलेले असावेत, जेणेकरुन नोंदणी करण्यात येणारे दस्तऐवज हे कायदेशिर व नोंदणी प्रक्रियेत नोंदविणेकामी सुलभ सोयीचे होईल . तसेच अनेक बेकायदेशिर कृत्यांना अटकाव करणारे ठरतील. अशी मागणी संघटनेने  निवेदनातून केली आहे.

       निवेदनावर मधुकर परीट, अनिल बनकर , शंकर यादव , गजानन घेवारी , रावसाहेब चौगुले ,दिलीप धनवडे , शब्बीर शेख , संजय बुढ्ढे , निवृत्ती कोळी , प्रकाश पांडव , सिंकदर मुजावर , रोहीत घोरपडे , इख्त्यार मुजावर , श्रीकांत चव्हाण , कुमार चव्हाण , सौ. भारती पांडव , संतोष पाटील , अॅड. सागर एडके , राजेंद्र भगत , पंकज बुढ्ढे ,  राहुल घोरपडे , सुरेश घेवारी , उमेश पाटील मुन्ना मुजावर आदिच्या  सह्या असुन  निवेदन देताना उपस्थित होते .

error: Content is protected !!