राज्यात करोनाचा विस्फोट आज ६३ हजारच्या वर नवे रुग्ण

    राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक आणखी वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून हा आतापर्यंतचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. राज्यातील वाढते करोनामृत्यू ही सुद्धा चिंतेची बाब बनली असून आज दिवसभरात ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांतील हा सर्वाधिक आकडा आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )
   राज्यातील करोना संसर्गाची स्थिती भीषण बनली आहे. दररोजचे करोनाचे आकडे पोटात भीतीचा गोळा आणणारे ठरले आहेत. गेले काही दिवस तर तब्बल ६० हजारांवर नवीन रुग्णांची दररोज भर पडू लागली आहे. त्याचवेळी मृत्यूंचा आकडाही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबत लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस असून बाजारात आणि रस्त्यांवरील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. ही स्थिती करोनावाढीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

error: Content is protected !!