रेंदाळच्या बिरदेव यात्रेत भाविकांची गर्दी वार्ताहर

हुपरी महाराष्ट्र, कर्नाटक सरहद्दीवर हजारो राज्याच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेंदाळ येथील ग्रामदैवत श्री बिरदेवाच्या यात्रेला रविवार १७ रोजी प्रारंभ झाला. यावेळी भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा आणि मानाचा भाकणूक सोहळा झाला.
रविवार हा यात्रेचा पहिला दिवस असल्याने श्री बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत गावातील प्रमुख मानकरी, कोरे, परीट, गवळी, समस्त धनगर, पुजारी, बारा बलुतेदार, सेवेकरी नागरिक व भाविक भक्तांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजता पहिली पालखी भानुस मंदिरातून सर्व लवाजम्यासह सवाद्य मिरवणुकीने श्री बिरदेव मंदिरात आली. त्यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर यात्रा सोहळ्यास सुरुवात झाली.सोमवार हा मानाच्या भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम झाला असून येथून पुढे दोन दिवस विधिवत धार्मिक कार्यक्रम धनगरी ओव्या, ढोल वादन पार पडणार आहेत. देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. परंपरेचा मान जपत सर्व मानकरी, संयोजक पावित्र्यमय विधी पूर्ण करीत असताना दिसत होते.
रविवारी पहिली पालखी मानकरी, पुजारी, यात्रा कमिटी, ग्रामपंचायतच्या सानिध्यात झाल्यानंतर ढोल वादन, रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडल्या. सोमवार १८ रोजी भर यात्रा सकाळी १० वाजता श्री बिरदेवाची मानाची भाकणूक, त्यानंतर गावातील मानकरी, गावकरी व सर्वांचे नैवेद्य आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर यात्रेचे परंपरेने चालत आलेला धार्मिक विधी होण्यास सुरुवात झाली.
मंगळवार १९ रोजी करमणूक कार्यक्रम, लोकनाट्य तमाशा होणार आहे. २० रोजी दुपारी ३ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बिरदेव मंदिराजवळच्या यशस्वी आखाड्यात होणार आहे.

error: Content is protected !!