मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर बोंब ; जनता कर्फ्यूला छोट्या व्यावसायिकांचा विरोध, कर्फ्यूच्या विषयाला राजकीय वळण ?

जयसिंगपूर / प्रतिनिधी

 जयसिंगपूर शहरातील गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या जनतेचा विचार करता जनता कर्फ्यू करु नका. तसेच भाजीपाला व फळविक्रेते यांच्यात दुजाभाव करु नये. या मागणीसाठी शहरातील हातगाडीचालक व भाजीपाला विक्रेते सोमवारी सकाळी नगरपालिकेसमोर जमले. या मागणीकडे मुख्याधिकार्‍यांनी पाठ फिरविल्याने संतप्त झालेल्या विक्रेते व सामाजिक कार्यकर्त्यानी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात जावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करून मुख्याधिकारीच्या नावाने बोंब ठोेकली. यावेळी भाजी व फळ विक्रेत्यासह विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर जयसिंगपूर शहरातील मर्चटस असोसिएनच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक व्यापाऱ्यांनी शहरात जनता कर्फ्यू करावा. अशी मागणी दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेला निवेदनाव्दारे केली आहे. याला अनेक छोटे-मोठे भाजीपाला फळविक्रेते व व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला कडकडुन विरोध केला. सोमवारी हातगाडी व भाजीपाला विक्रेते साहित्यासह पालिकेच्या दारात आले.
नगराध्यक्षा डॉ. निता माने यांनी यासर्वाबरोबर चर्चा केली. यावेळी अनेकांनी गेल्या चार महिन्यापासुन सुरु असलेल्या जनता कर्फ्यूमुळे व्यवसाय अडचणीत आहेत. उपासमारीची वेळ आली असून मोठया व्यापार्‍याचे ऐकुन जर शहर बंद ठेवणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. अशा संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. आणि त्यातूनही शहर बंद ठेवणार असाल तर
 आमच्या उदरनिर्वाहसाठी प्रति आठवडयाला एक हजार रुपये दयावे, पालिकेने घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी . अशा भावना व्यवसायिकांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना खोकी संघटनेचे अध्यक्ष सुनिल ताडे म्हणाले, जिल्हाबंदी होणार असेल तर जयसिंगपूर शंभर टक्के बंद करा. शहरातील धनदांडग्या व्यापाऱ्यांचे मागणीवरून जर निर्णय घेणार असाल आम्हाला मान्य नाही. आम्ही उपासी मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेले पसंत करू.
 यावेळी भाजी विक्रेते हातगाडी व छोटया -मोठया व्यवसायिकांच्यावर अन्याय करुन दुजाभाव करत असल्याचा जाब विचारला असता नगराध्यक्षा डॉ. माने यांनी हा प्रशासनाचा भाग असल्याचे सांगितले. त्यानंतर विक्रेत्यांनी मुख्याधिकारी व प्रशासनाला बोलविण्याची विनती केली. मात्र अनेक वेळा निरोप देऊनही मुख्याधिकारी टीना गवळी बैठकीच्या ठिकाणी न आल्याने सर्व संतप्त झालेल्या व्यवसायिकांनी थेट आपला मोर्चा मुख्याधिकारी कक्षात वळविला. मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत तुम्हाला जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही का? असा सवाल केला. पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करुन मुख्याधिकारी यांच्या नावाने त्यांच्या दालनासमोर बोंब ठोकली. दरम्यान नगराध्यक्ष डॉ. माने यांनी कर्फ्यू बाबत गुरुवारी बैठक होणार आहे. यात या मागणीचा विचार करुन निर्णय घेवू असे सांगितले त्यानंतर व्यापारी शांत झाले.
या वेळी माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर, भाजपाचे मंडळ अध्यक्ष रमेश यळगुडकर, रासपचे संजय वैद्य , आम आदमी पार्टीचे आदम मुजावर, स्वाभिमानीचे शंकर नाळे, अमित सांगले सुरेश शिंगाडे, संजय सारस्वत, राजू सुतार, भगवंत जांभळे, संजय चव्हाण यांच्यासह भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.

error: Content is protected !!