कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पाऊस झाला आहे तर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार आहे. तसेच या पावसामुळं अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर परिणाम झाला आहे.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळं या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केलं आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. काल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अन्य काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. आज देखील राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे