हणमंतवाडीत IPL वादातून झालेल्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू; तीन दिवस सुरु होते उपचार

कोपार्डे (कोल्हापूर): मुंबई इंडियन्स व सनराईजर्स हैदराबाद या दोन संघात सामना सुरू होता. या सामन्यात कोण जिंकणार यातून झालेल्या वादातून हणमंतवाडी (ता.करवीर) येथे वृध्दाच्या डोक्यात लाकडी फळी घालून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यात जखमी झालेल्या बंडोपंत बापू तिबिले (वय ६५) यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. गेली तीन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते.

मिळालेली माहिती अशी सख्खे शेजारी व क्रिकेट शौकीन असणारे बंडोपंत तिबिले व बळवंत झांजगे हे गल्लीतील शिवाजी गायकवाड यांच्या घरात बुधवारी टीव्हीवर मुंबई इंडियन्स विरूद्ध हैद्राबाद सनराईजर्स यांच्यातील सामना पहात बसले होते.मुंबई इंडियन्सचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर बंडोपंत यांनी मुंबई इंडियन्सला सामना जिंकता येणार नाही असे वक्तव्य केल्याने मुंबई इंडियन्सचा चाहता बळवंत झांजगे यांच्या बरोबर बाचाबाची झाली. बळवंत झांजगे यांनी काठीने व त्याचा पुतण्या सागरने लाकडी फळी बंडोपंत यांच्या डोक्यात घातली.या मारहाणीत गंभीर जखमी झालेले बंडोपंत जमीनीवर कोसळले. त्यांच्या नाकातोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाल्याने नातेवाईकांनी बंडोपंत यांना तात्काळ कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेली तीन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणी नंतर बंडोपंत यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तिबिले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे.

या अगोदरच गुरुवारी हल्ला करणारे संशयित सागर सदाशिव झांजगे(वय ३६ ) व बळवंत महादेव झांजगे (वय ६०) दोघेही रा. हणमंतवाडी (ता. करवीर) या दोघा चुलत्या पुतण्याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गावात तणावपूर्ण शातंता आहे.

बंडोपंत हे बैलगाडी शर्यत व क्रिकेट शौकीन- बंडोपंत बुधवारी दिलसभर शेतात ऊसाची लागण करून आले होते.पण क्रिकेट शौकीन आणि मित्रांच्याबरोबर क्रिकेट बघण्याची हौस होती. बळवंत व बंडोपंत एका बाकावर बसून दररोज आयपीएल सामने पहात होते. पण एका क्षणाचा रागाने मित्रानेच मित्राचा बळी घेतला.
सामाजिक कार्यात पुढे – बंडोपंत नेहमी सामाजिक कार्यात पुढे होते.गावात एखाद्याचे निधन झाले तर अत्यसंस्काराचे साहित्य पोहचवण्यापर्यंत पुढे येऊन काम करत होते. ते ट्रँक्टर चालक होते साधा व सरळ स्वभावाचे बंडोपंताचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!