भावजयचा खून करून पळून जाताना अपघातातच दीराचाही मृत्यू

आंबळे (ता. शिरूर) पुण्यातील (pune) काम सोडून गावाकडील शेती व जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ व भावजयवर चाकूहल्ला करीत डोक्यात लोखंडी डंबेल्स घातल्याने भावजय जागीच ठार झाली; तर भाऊ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दूचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. आंबळे (ता. शिरूर) येथे आज पहाटे चार ते पाच च्या दरम्यान हा थरार घडला.

अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५) असे मृत हल्लेखोराचे नाव असून, त्याने केलेल्या हल्ल्यात प्रियांका सुनिल बेंद्रे (वय २८) यांचा जागीच मृत्यु झाला; तर सुनिल बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत व जखमी हे तिघेही उच्चशिक्षित आहे. बाळासाहेब पोपट बेंद्रे (रा. अंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या प्रकरणातील मृत सुनिल बेंद्रे व जखमी अनिल बेंद्रे हे सावत्र भाऊ असून, दोघेही पुण्यात नोकरीस होते व तेथेच वास्तव्यास होते.

पदवीधर असलेला अनिल हा खासगी कंपनीत नोकरीस होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सुनिलही खासगी कंपनीत नोकरीस होता. दारूचे व्यसन असलेला अनिल हा कुठल्याही एका कंपनीत टिकून काम करीत नसल्याने त्याला गावाकडे आणून शेती करायला द्यावी किंवा गोपालनाचा व्यवसाय सुरू करून द्यावा, असे सुनिल यांनी सांगितल्याने फिर्यादी बाळासाहेब बेंद्रे यांनी त्याला १५ एप्रिल रोजी गावी आंबळे येथे आणले होते.

तथापि, शेती करायची व गावी राहायची मानसिकता नसलेला अनिल परत पुण्याला जाण्यासाठी वडीलांकडे पैसे मागत होता व भांडत होता. सावत्र भाऊ सुनिल याच्या सांगण्यावरूनच वडीलांनी आपल्याला गावी आणल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातच त्याने रविवारी (ता. २३) रागाच्या भरात घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घरातील सर्व वस्तू टेबल, खूर्च्यांची मोडतोड केली होती. मात्र, कुटूंबियांनी समजून सांगितल्यानंतर तो शांत झाला होता.

काल (ता. २४) रात्री सर्व कुटूंबियांनी एकत्र जेवण करून गप्पा मारल्या. सुनिल हे पत्नी प्रियांकासह घराच्या टेरेसवर झोपायला गेले; तर अनिल खालील बेडरूममध्ये झोपला. फिर्यादी बाळासाहेब हे आई व पत्नीसह हॉलमध्ये झोपले असताना पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना टेरेसवरून आरडाओरडा ऐकू आल्याने ते टेरेसवर गेले. तेव्हा अनिल हा सुनिल यांच्यावर डंबेल्स ने हल्ला करीत होता.

बाळासाहेब हे मधे गेले असता त्याने त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी शेजारीच असलेल्या चुलत भावाला व त्याच्या मुलांना मदतीसाठी हाक मारली. ते सर्व मदतीसाठी धावले असता अनिल दूचाकीवरून पळून गेला. त्यावेळी प्रियांका या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या सर्वांगावर चाकूने भोसकल्याच्या खूणा होत्या.

दरम्यान, दूचाकीवरून (क्र. एमएच १२ एमयु ४२८६) न्हावरे च्या दिशेने जात असताना आंबळे पासून जवळच अनिल बेंद्रे याच्या दूचाकीची समोरून येणाऱ्या मोटारीशी (क्र. एमएच १२ ईएक्स ६६९५) धडक झाली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ ससून रूग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर शिरूर चे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सुनिल उगले, सुजाता पाटील व एकनाथ पाटील, सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

error: Content is protected !!