गद्दारी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना पराभूत करा – संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर

   पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना पराभूत करा. तसेच व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता ठाकरे जो उमेदवार देतील तो, मग महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक शाहू स्मारकमध्ये झाली. अध्यक्षस्थानी दूधवडकर होते. या बैठकीत ते बोलत होते.
  शिवसेना आणि ठाकरे यांनी शिवसैनिकांना मोठे केले. सत्तेची पदे दिली. दुर्दैवाने त्यांनी ठाकरे यांनाच फसवले. त्यात कोल्हापूरचे दोन्ही खासदार होते. शेवटपर्यंत सोबत राहण्याचा विश्वास देऊन त्यांनी विश्वासघात केला. छत्रपतींच्या अलौकिक वारसा लाभलेल्या या नगरीमध्ये विश्वासघात करणाऱ्यांना थारा नाही आणि यशही मिळत नाही हा इतिहास पुन्हा सत्यात आणून दाखवू. कोल्हापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करू, असे दूधवडकर यांनी सांगितले उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कोल्हापूरची स्वाभिमानी जनता गद्दारांना कधीही स्थान देणार नाही. भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या भाजपला व गद्दारांच्या महायुतीला जनता योग्य ती जागा दाखवेल. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अस्लम सय्यद, जिल्हाप्रमुख वैभव उगले, संजय चौगुले, सुनील शिंत्रे यांच्यासह माजी आ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील- सरूडकर, उल्हास पाटील, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले व सुनील मोदी उपस्थित होते.
error: Content is protected !!