पुरवठा निरीक्षण अधिकारी पद भरा ताराराणी पक्षातर्फे मागणी

   इचलकरंजी पुरवठा कार्यालयातील निरिक्षण अधिकारी पद हे वर्षभरापासून रिक्तच आहे. त्यामुळे पुरवठा कार्यालयातील अनेक कामे खोळंबली असून बहुतांशी शिधापत्रिकांवर बारा अंकी क्रमांकच नसल्याने त्यांना अन्नधान्य योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच आरोग्य संदर्भातील योजनांपासून वंचित रहावे लागत असल्याने रिक्त पद भरण्यासह शिधापत्रिकांवर बारा अंकी क्रमांक  देण्यात यावे, अशी मागणी ताराराणी पक्षाचे वतीने तहसिलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

येथील पुरवठा निरिक्षण अधिकारी पद हे मागील एक वर्षापासून रिक्तच आहे. त्यामुळे पुरवठा कार्यालयाशी संबंधित अनेक कामे प्रदीर्घकाळापासून रखडली आहेत. शिधापत्रिकांवर बारा अंकी क्रमांक नसल्याने अन्नधान्यापासून वंचित रहावे लागत असल्याने आमदार प्रकाश आवाडे व ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. हे निवेदन प्र. पुरवठा निरिक्षण अधिकारी सुरेखा पोळ यांनी निवेदन स्विकारले.
निवेदनात, इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून ते कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहर व परिसरात कष्टकरी कामगार, झोपडपट्टीवासिय कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. केंद्र व राज्य शासन या नागरिकांना अन्नधान्य व आरोग्य सेवा मोफत देत आहे. पण बहुतांशी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळत नसल्याने बारा अंकी क्रमांकाची नोंदच झालेली नाही. ज्या शिधापत्रिकांवर बारा अंकी नंबर नाही, त्यांना रेशनसंदर्भातील कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच आयुष्यमान भारत/गोल्डन कार्डची नोंदणी होऊ शकत नसल्याने त्यांना वंचित रहावे लागत आहे. पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरिक्षण अधिकारी पद हे भर्षभरापासून रिक्तच असल्याने अशा शिधापत्रिकाधारकांना बारा अंकी क्रमांक मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ज्या अधिकार्‍यांकडे पुरवठा निरिक्षण अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे, त्यांना शिधापत्रिकांवर बारा अंकी क्रमांक टाकण्यासंदर्भात सूचना कराव्यात त्याचबरोबर रिक्त असलेल्या पदावर तातडीने अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी रमेश पाटील, नरसिंह पारीक, संजय केंगार, सुखदेव माळकरी, श्रीमती मंगल सुर्वे, विजय पोवळे, रामा पाटील आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!