डॉ.अर्जुन चव्हाण यांची लेखणी हिंदीला विश्वभाषा बनवेल. डॉ. मोहनलाल छीपा : डॉ. अर्जुन चव्हाण यांच्या अभिनंदन ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : लिहिण्याची सवय माणसाला अमर बनवते. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी ही सवय जपली आहे. त्यांनी इतरांनाही लिहिण्यासाठी प्रेरित केले आहे. हिंदी विश्वभाषा बनली पाहिजे यासाठी डॉ. चव्हाण यांनी यासाठी लेखन करावे, कारण त्यांच्या लेखणीत तेवढी ताकत आहे, उच्च शिक्षणाचे माध्यम हिंदी करण्यासाठीच्या प्रयत्नात डॉ. अर्जुन चव्हाण यांचेही योगदान मिळेल या शब्दात भोपाळच्या अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. मोहनलाल छीपा यांनी हिंदीचे ज्येष्ठ साहित्यकार, शिवाजी विद्यापीठातील हिंदीचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले.
प्रा.डॉ. अर्जुन चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ‘ इक्कीसवीं सदी के विविध विमर्श : प्रो. (डॉ.) अर्जुन चव्हाण अभिनंदन ग्रंथ’ या पुस्तकाच्या लोकार्पण व सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू प्रमोद पाटील होते. या कार्यक्रमाला डॉ. चव्हाण यांचे देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवित आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त केला.

यावेळी मराठी – हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, डॉ. चव्हाण हे स्वत:च्या कर्तुत्वावर यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. त्यांनी आपल्या भाकरीसोबत इमानही राखले. हिंदी भाषा व साहित्य सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांना कर्मभूमी कोल्हापूरात उपेक्षाच वाट्याला आली. पण, देश-विदेशात त्यांनी लेखनाच्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव उंचावले.
यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय मुरूमकर, डॉ. बी. एम. हिर्डेकर, दिल्ली येथील वाणी व ज्ञानपीठ प्रकाशनचे अरूण माहेश्वरी यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी डॉ. चव्हाण यांच्या जीवन व कार्यावरील अनिल मकर द्वारा लिखित ‘शून्य से शिखर तक’ माहितीपटही दाखविण्यात आला. यावेळी डॉ. शंकरसिंह बुंदेले, डॉ. सीताराम पवार, डॉ. देविदास इंगळे यांच्यासह हिंदी विषयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. अर्जुन चव्हाण यांचे विद्यार्थी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला (वारणानगर) ‘नॅक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये ‘ए प्लस ग्रेड’, प्राप्त करण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल,तर प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य शहाजान मणेर, प्राचार्य येलोरे, यांचाही या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत डॉ. यादवराव धुमाळ यांनी केले. डॉ. सरोज बिडकर यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. शकुंतला सरूपरिया, डॉ. शोभा निंबाळकर, डॉ. कविता सुल्याहन यांनी सूत्रासंचालन केले. आभार प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी मानले. सलग दहा तास समारंभ चालला. कोल्हापूर नगरीत गुरुचा विद्यार्थ्यांनी केलेला सत्कार आणि देशभरातील मान्यवरांची उपस्थिती ऐतिहासिक घटना असल्याचे मत अनेक विद्वानांनी बोलून दाखविले. डॉक्टर अर्जुन चव्हाण यांच्या आचार विचारा वरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील किंबहुना देशभरातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्र- कुलगुरू, लेखक, पत्रकार, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, मित्र मान्यवरांच्या बरोबरच समिती सदस्य आणि ग्रंथ संपादक प्रा. डॉ. मनोहर भंडारी, संयोजक प्रा.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, अनिल मकर, प्रा.संपत जाधव इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी डॉक्टर अर्जुन चव्हाण यांच्या कुटुंबीयां समवेत नातेवाईक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन :

यावेळी सकाळच्या सत्रात डॉ. चव्हाण यांच्या जीवन व साहित्यावर आणि एकविसाव्या शतकातील हिंदी साहित्यातील विविध विमर्श विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयपुरच्या शकुंतला सरूपरिया- राजस्थान, अरुण माहेश्वरी- दिल्ली, डॉ. देविदास इंगळे धाराशिव, डॉ. सीताराम पवार- धारवाड यांनी विचार व्यक्त केले.

सत्काराने अविरत लेखनाला बळ :

सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण म्हणाले की, माझ्या अवतीभोवतीचे सामाजिक सामाजिक वातावरण आणि अनुभवाने मी घडत गेलो. या वातावरणानेच मला लेखनासाठी प्रेरित केले. आयुष्यभर मी सामान्य जीवन शैलीत जगण्याचा प्रयत्न केला. कोणाची मुद्दाम उपेक्षा केली नाही आणि कोणाकडून फार अपेक्षाही केली नाही. माझ्या कुटुंबियांच्या पाठबळामुळे मी आजवरचा प्रवास जीवन प्रवास करू शकलो. यापुढेही माझे लेखन कार्य अविरत सुरू राहील, इतकी प्रेरणा या सत्काराने मला दिली.

फोटो ओळी :
1.शिवाजी विद्यापीठातील शाहू सिनेट हॉल येथे हिंदीचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना भोपाळच्या अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. मोहनलाल छीपा. यावेळी उपस्थित अरूण माहेश्वरी, मनोहर भंडारे, सुनीलकुमार लवटे आदी मान्यवर.

2.कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ येथील शाहू सिनेट सभागृहामध्ये अभिनंदन ग्रंथाचे प्रकाशन करताना भोपाळच्या अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. मोहनलाल छीपा, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. अर्जुन चव्हाण, अरूण माहेश्वरी, डॉ. शंकरसिंह बुंदेले, डॉ. सुनीलकुमार लवटे, मनोहर भंडारे, डॉ. दत्तात्रय मुरूमकर, यादवराव धुमाळ आदी मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!