मंदिरे, पुरातन वास्तूमधून देशाच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन ; विद्यापीठाच्या चर्चासत्रात डॉ. देगलूरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर /ता. १७

       देशातील ऐतिहासिक मंदिरे व पुरातन वास्तूमधून राष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन घडते. मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंची सर्वांनी जोपासना करण्याबरोबरच देशातील पर्यटन वाढीसाठी याचा उपयोग होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. जी. बी. देगलूरकर यांनी केले.
          रविवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातर्फे मंदिर स्थापत्य आणि पर्यटन या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन करताना डॉ. देगलूरकर हे बोलत होते. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रास भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे उपसचिव राजेशकुमार साहू प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले. मान्यवरांचा परिचय पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला.
          डॉ. देगलूरकर यांनी भारतातील मंदिर स्थापत्य वैशिष्ट्य याविषयी महत्त्व विशद करत मंदिराच्या विविध प्रकारांची माहिती दिली. मंदिर रचनेतील विविध भागाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी मंदिराचे वास्तु, धर्म आणि तत्त्वज्ञान तसेच सामाजिक संस्कृतीविषयी भाष्य केले. ऐतिहासिक मंदिरे व पुरातन वास्तूमधून देशाच्या जाज्वल्य इतिहासाची सर्वांना माहिती व प्रेरणा मिळते. यामधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीस चालना देखील मिळते. त्याचा योग्य वापर व्हावा, असेही डॉ. देगलूरकर यांनी यावेळी सांगितले.
साहू यांनी भारतातील पर्यटनाचे कोविड-19 पूर्वीची परिस्थिती आणि कोविड-19 नंतरची परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. भारतातील पर्यटनातील महत्त्वाचे केंद्रबिंदु ही विविध भागातील मंदिरे आहेत. देशातील पर्यटन विकासासाठी पर्यटन मंत्रालय कार्य करीत असून विविध उपक्रम राबवत आहे.
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आणि रोजगार निर्मितीमध्ये पर्यटनाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
         कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, सोलापूर जिल्हा मंदिर स्थापत्याने नटलेला असा जिल्हा आहे. या जिल्ह्यात असलेल्या विविध मंदिरांची अधिक काळजी घेणे आणि पर्यटन क्षेत्र म्हणून सोलापूर जिल्ह्याची अधिकाधिक उंची वाढवणे गरजेचे आहे. विद्यापीठाने पर्यटन क्षेत्रामध्ये एक नवे पाऊल टाकून कृषी पर्यटनाचा विकास करणारे केंद्र स्थापित केले आहे. यापुढील काळामध्ये विद्यापीठ अनेक नवनवीन उपक्रम हाती घेऊन पर्यटन विकास करण्यास प्रयत्नशील राहील. यासाठी विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभाग आणि शासनामध्ये सामंजस्य करार करून अधिक चांगली कामे करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          राष्ट्रीय चर्चासत्राचा एक हजाराहून अधिक जणांनी लाभ घेतला. यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मान्यवरांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!