मुंबई / दि. २१:
जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. संजय पाटील (यड्रावकर) यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी एक रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले होते . आज डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने ही रुग्णवाहिका कृषीमंत्री श्री. दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय पाटील (यड्रावकर) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

राजेंद्र पाटील (यड्रावकर) सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्यावत कोविड सेंटरचे लोकार्पण नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. यावेळी जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. संजय पाटील (यड्रावकर) यांनी राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे रुग्णवाहिका देण्याची विनंती केली होती. त्यानुसार तात्काळ श्री. शिंदे यांनी विनंती मान्य केली होती. त्यानुसार आज शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी श्री. मंगेश चिवटे यांच्या विशेष प्रयत्नाने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने सुसज्ज रुग्णवाहिका जयसिंगपूरसाठी देण्यात आली. यावेळी कृषीमंत्री श्री. दादा भुसे, उपनगराध्यक्ष श्री. संजय पाटील यड्रावकर, श्री. मंगेश चिवटे, नगरसेवक श्री. राहुल बंडगर ,जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजू मालू आदि मान्यवर उपस्थित होते.
रुग्णांच्या सोयीसाठी त्वरित उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेबद्दल श्री. संजय पाटील यांनी नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले . तसेच याबाबत विशेष प्रयत्न करणारे श्री. मंगेश चिवटे यांना धन्यवाद दिले. सदर रुग्णवाहिकेमुळे जयसिंगपूर आणि परिसरातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविणे शक्य होणार आहे.