अनधिकृत शाळेसाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरणार

   राज्य शासनाची मान्यता नसताना जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरण्यात येणार असून, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रवीण मुंढे यांनी आदेश काढले आहेत. राज्य शासनाची मान्यता नसतानाही अनधिकृतरित्या शाळा सुरू करून विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या मान्यतापत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात अनधिकृत शाळा आढळून आल्या होत्या. अशा अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अधिकृत शाळा सुरू होऊ नये याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.
error: Content is protected !!