कोल्हापूर-रत्नागिरी एसटीच्या इंजिनला लागली आग

एसटी महामंडळाच्या कोल्हापूर (ST Corporation Kolhapur) आगाराच्या कोल्हापूर-रत्नागिरी बसला अचानक इंजिनला आग लागल्याने गोंधळ उडाला. परंतु, चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी बाजूला घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. पालिकेच्या अग्निशमन विभागानेही तत्परता दाखवत तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.

Kolhapur-Ratnagiri ST Bus Fire
 रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील रेल्वेस्थानक फाट्यानजीक गयाळवाडी येथे ही घटना काल (सोमवार) दुपारी सव्वादोन वाजता घडली. कोल्हापूर आगाराचे चालक सुहास शिंदे हे कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी एसटी घेऊन वाहक एस. एस. मराठे यांच्यासमवेत रत्नागिरीकडे निघाले होते. बसमध्ये ५५ प्रवासी होते.

दुपारी कारवांचीवाडी येथे काही प्रवासी (Passengers) उतरल्यानंतर बस मार्गस्थ झाली. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने बसचा वेग कमी होता. अचानक गयाळवाडी येथे बसच्या गिअर बॉक्समधून अचानक धूर येऊ लागला. बसमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक सुहास शिंदे यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. इंजिनला आग लागल्याची कल्पना त्यांनी वाहक एस. एस. मराठे यांना दिली. त्यांनी बसच्या आपत्कालीन दरवाजा उघडून आतील सुमारे ५५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

काही प्रवाशांनी तत्काळ रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. १० मिनिटांतच पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत इंजिनसह चालकाची सीट जळून खाक झाली होती. प्रवाशांनी आपल्याकडील बाटल्यांमधील पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बंबाने आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविल्यामुळे आगीमुळे बस पेट घेण्यापासून बचावली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले. हवालदार भितळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक सुहास शिंदे यांनी या घटनेची माहिती एसटीच्या रत्नागिरी, कोल्हापूर विभागाला दिली. त्यानंतर रत्नागिरी आगाराचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

error: Content is protected !!