फडातलं – सोनं

काकू,या पोराचं नाव काय ? काकु ने डोक्यावरचं ओझं सांभाळत घाईगडबडीत उत्तर दिलं श्रीस. ( श्रेयस )

सकाळचे अंदाजे सात वाजले असतील, नेहमीप्रमाणे मी माझ्या शेतातील गोठ्यात
‘ धारा ‘काढण्यासाठी गेलो होतो.माझ्या वडिलांना घरातून आणलेला चहा व नाश्ता दिला. पण गोठ्याकडे येत असताना, माझं मन आज काही जागेवर लागत नव्हतं. कारण माझ्या गोठ्या समोरच एका मोकळ्या माळावर गेली दोन महिने ” भाकरीचा चंद्र ” शोधण्यासाठी, शेकडो मैल प्रवास करून आलेल्या स्वाभिमानी व कष्टाळू कर्मयोग्यांचा संसार मी पाहत होतो. पण दररोजचं चित्र आणि आजचं चित्र खूप भयावह व काळजाला चिरून टाकणारं होतं. कारण या माळावर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यावरील सात – आठ चिमुकली पोरं मोकळी कॅन आणि तुटलेली भांडी यांची सांगड घालत मोठ्या आनंदात खेळत होती.तहान भूक हरवून त्यांचा आनंद आज गगनात मावत नव्हता.तेवढ्यात नेहमीप्रमाणे पाल्यावरील बायकांनी, भल्या पहाटे उसाच्या फडात गेलेल्या आपल्या पुरूष गड्यांच्यासाठी ” भाकर – कालवण ” यांची शिदोरी बांधून जाताना दिसल्या.तसं प्रत्येक पोरांना आपापल्या आईच्या मागे धावत जात आईच्या हातातील कोयता,चेपकी – फुटकी भांडी, फडक्यांची गाठोडी यासह अनेक साहित्य आपल्या डोक्यावर घेऊन आईच ओझं कमी केलं.मात्र अवघ्या एक वर्षाच्या श्रीस ( श्रेयस ) ला ना त्याच्या आईने जवळ घेतलं,ना त्याच्या आजीने.ते अवघ्या वर्षाचा पोर अक्षरश: फडावर जाण्यासाठी “धाय मोकलून” रडत होतं. कासरा दोन कासरा ते त्या फफुट्यात लोळत होतं, मात्र ” सासु
अन् सुनेचा ” वाद समजावा, एवढा जीव तो मोठा झाला नव्हता.

काल रात्रीच त्या पाल्या यावरील एका खोपट्यात सासू आणि सुनेचा मोठा वाद झाला होता.आणि नेहमीच्याच या वादामुळे त्याच खोपाटातील प्रमुख
माणसानं प्रचंड दारू पिवून रात्री हैदोस घातला होता. बहुतेक सगळेच जण रात्रीपासून उपाशी असावेत,कारण या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उपाशीपोटी असलेली
‘ मरगळ ‘ आज मोठ्या प्रखरतेने जाणवत होती. हे चित्र माझ्या उघड्या डोळ्यांना, वास्तवतेचे भान आणि जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष….. या दोहोंचा समग्र अनुभव देत होता.

आपल्या खोपटातून सासु नजरेआड होत नाही, तोपर्यंत रस्त्याच्या मधोमध हुंदका देत पडलेल्या पोराला, घ्यायला त्याची आई आली नव्हती. मात्र नंतर पळत – पळत येऊन फफुट्यात पडलेल्या आपल्या पोराला बिलगून त्या मातेने फोडलेला हंबरडा माझ्यासारख्या
‘ पामराला ‘ डोळे ओलेचिंब करणारा ठरला. मी स्वतःला लगेच सावरत पटकन त्या माय लेकरा जवळ गेलो.आणि अपेक्षेप्रमाणे पहिला प्रश्न केला. तुम्ही कुठून आला ? कोणत्या कारखान्यासाठी ऊस तोडता ? या पोराच्या शिक्षण आणि भविष्याचं काय ? त्या मातेने मला एका वाक्यातच उत्तर दिलं ……..

दादा……..आपल्या दुष्मनाला बी ऊसतोड मजुराचं जगनं नगं. हेच देवाला साकडं……! नवऱ्याच्या दारू पाई पुढचं दोन हंगाम सुद्धा आम्ही
राबलो, तरीबी कर्ज फीटायचं नाय. दोन दिसापासून या लेकराबरोबर सारं घर उपाशी हायं……माझा बा पण दारू तच मेला……..आणि माझ्या बहिणीच्या नवऱ्यानं, परवाचं दारू पिऊन गळफास
घेतलयां……..!
ही सारी वाक्यं एका दमात बडबडतच ती माय आपल्या लेकरा सह खोपटात गेली.रात्री ताटात वाढलेल्या, भाकरीच्या पापुट्यावर…….चटणीचा
” फपुटा ” पाहून, मॅगी आणि नूडल्स चा अट्टाहास करणाऱ्या, पांढरपेशी समाजाचा चेहरा माझ्या डोळ्या समोर उभा ठाकला.
आणि जगण्याचं खरंखुरं वास्तव आज उभं राहिलं.

स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी,कष्ट करावे लागतात. हे जरी खरं असलं ………. तरीदेखील देवाने दिलेले पोट आणि त्याची खळगी भरून काढण्यासाठी ” संघर्ष ” नावाचा भला मोठा हिमालय, गाठायचा असतो………. हे आज कळून चुकलं होतं.

आपल्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य असतानासुद्धा, जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि पदरात विस्तव पडलं असतानासुद्धा ” विस्तव विझू न देणार्‍या व पदर पेटू न देणाऱ्या ” या मातांना माझा मनापासुन सलाम………!

धनंजय टारे –
90115616 90

आळते ता.हातकणंगले जि. कोल्हापूर ……..!

error: Content is protected !!