गर्भलिंग निदान रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश

कोल्हापुरातील वाशीनाका म्हाडा कॉलनीतील (Mhada Colony) एका घरात गर्भलिंग चाचणी (Pregnancy Test) करून देऊ, मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू, अशा भूलथापा लावत सोनोग्राफीद्वारे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान होत होते. त्या घरात जिल्हा, शहर आरोग्य पथक व महिला बाल कल्याण समितीच्या पथकाने छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला. यावेळी अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या वस्तू वितरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

याप्रकरणी पोलिसांनी घरातून अमित डोंगरे व कृष्णात आनंद जासूद या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील डोंगरे घर मालक आहे. तो लॅब टेक्निशियनचे काम करतो. जासूद छाप्यावेळी घरातच सापडला. स्वप्निल पाटील नावाची आणखीन एक व्यक्ती मात्र पथक पोहोचताच तेथून निघून गेल्याचे समजते. तो बोगस डॉक्टर (Doctor) असल्याचेही सांगण्यात आले.

आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावारा, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर यांच्यासह डझनभर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीच्या सहभागाने ही कारवाई झाली.

error: Content is protected !!