जिल्हा बँकेच्या ठेवीच्या उद्दिष्ट पूर्तीमध्ये शिरोळ तालुका जिल्ह्यात प्रथम – मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर / प्रतिनिधी

    सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या ठेव संकलनाच्या उद्दिष्टांमध्ये शिरोळ तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहीला असल्याने बँकेच्या तालुक्यामधील सर्व शाखांमधील अधिकारी- कर्मचारी, सभासद, ग्राहक, बँकेच्या व्यवसाय वृद्धी साठी ज्या ज्या घटकांनी सहकार्य केले ते सर्वजण कौतुकास पात्र आहेत असे उद्गार जिल्हा बँकेचे संचालक व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले .

    जिल्हा मध्यवर्ती बँकेने ठेव संकलनासाठी शिरोळ तालुक्याला ८१५ कोटी ६० लाखाचे उद्दिष्ट दिले होते अधिकारी व कर्मचारी यांचे प्रयत्न व सभासद ठेवीदार यांनी केलेले सहकार्यामुळे मार्च २०२१ अखेर ८८७ कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी जमा करण्यात यश आले आहे दिलेल्या उद्दिष्टाच्या १०९ टक्के ठेवीचे उद्दिष्ट शिरोळ तालुक्याने पूर्ण केले असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला असल्याची माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली,
  त्याचबरोबर वाढीव शेअर्ससाठी शिरोळ तालुक्याला १५० कोटी रुपये संकलित करण्याचे उद्दिष्ट दिले होते यामध्ये सुद्धा शिरोळ तालुक्याने १६९ कोटी ८४ लाखाची रक्कम वाढीव शेअर्स म्हणून संकलित केली आहे दिलेल्या उद्दिष्टापैकी याचे प्रमाण देखील ११३ टक्के इतके असल्याचे सांगताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणीत शिरोळ तालुक्याचे सातत्याने योगदान राहिले आहे, या तालुक्यातील कष्टकरी शेतकरी बँकेचे सन्माननीय सभासद, जिल्हा मध्यवर्ती बँकेद्वारे व्यवहार करणारे सर्व छोटे-मोठे उद्योजक, व्यापारी वर्ग, नोकरदार या सर्व घटकांनी जिल्हा बँकेच्या प्रशासनावर सातत्याने विश्वास व्यक्त करताना बँकेच्या वाढीसाठी सहकार्य केले आहे असे सांगितले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचा कारभार महाराष्ट्रात आदर्शवत झाला आहे, बँकेकडे ७१२८ कोटी रुपयाच्या ठेवी सध्या जमा असून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची शिखर बँक म्हणून प्रगतिपथावर आहे असेही शेवटी राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले

error: Content is protected !!