प्रतिक्षा.. हुरहूर…. अखेर तणावाचे रूपांतर भितीत …..एका दिवसांत तब्बल ४१ पॉझिटिव्ह तर एकुण रूग्ण ५८ ; गावासह परिसर हादरला

गारगोटी /ता.४ (आनंद चव्हाण)

        गेले चार दिवस ग्रामस्थांना होती ती फक्त प्रतिक्षा… .प्रतिक्षेबरोबर प्रत्येकाच्या मनात होती ती बेचैन करणारी हुरहूर,…आणि चेहऱ्यावर दिसत होता कमालीचा तणाव.. आज ती प्रतिक्षा संपली पण तिचे रूपांतर दुदैवाने भितीमय झाले, जे नको तेच घडले, अन् पुष्पनगरमध्ये एकाच दिवशी तब्बल ४१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, आणि सारा गाव हवालदिल झाला, भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर गावची स्थिती आज अशी झाली,गावच्या कुशीतून दुथडी भरून वाहणाऱ्या आणि गावाला समृद्धी प्राप्त करून देणारी वेदगंगा नदी या गोष्टीने क्षणभर गदगदली.गारगोटी पासून चार किलोमीटर अंतरावर असणारे भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर हे गाव वेदगंगा नदीच्या तीरावर वसलेले, जेमतेम दोन हजार लोकवस्ती असणारे गाव असून तालुक्यातील अत्यंत समृद्ध असणारे गाव आहे.
        गेल्या आठवड्यात पुष्पनगर येथील चौघांना ताप सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांना क्वॉरन्टाईन करून नमुने घेतले असता, सतरा जण पॉझिटिव्ह आले होते. यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाल करत पुष्पनगर गावातील ७७ लोकांना क्वारंटाईन केले. त्यांचे स्वॕब घेतले. यामध्ये ७७ पैकी ४१ जणांचे अहवाल काल मध्यरात्री पॉझिटिव्ह आले. तर ३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान पुष्पनगरचा रहिवासी असलेल्या एका पोलिसांचा अहवाल निगेटिव्ह आला. ते करवीर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
आता इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने पुष्पनगर गाव हबकून गेले आहे. तर आसपासच्या गावांसह संपूर्ण भुदरगड तालुका तणावाखाली आला आहे. अद्याप गावातील आणखी काही लोकांचे नमुने घेण्याची शक्यता आहे.

पुष्पनगर मध्ये समूह संसर्ग पुष्पनगर मधील सुमारे वीस जण गडहिंग्लज येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणी हा संसर्ग झाला असल्याची माहिती एका ग्रामस्थांने दिली. त्या ठिकाणी भेटलेल्या एका डॉक्टरने सर्वांनाच क्वारंटाईन होण्याबाबत सल्लाही दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ ओढवल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह झालेले१७ आणि आजचे ४१ असे ५८ कोरोना रुग्ण एका पुष्पनगर गावांतील असून हा समूह संसर्ग असलेचे मानले जात आहे.

गारगोटी शहरात आता खबरदारी घ्यायला हवी

गारगोटी मध्ये हा कम्युनिटी स्प्रेड पसरु नये म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. प्रशासन व ग्रामपंचायतीने गारगोटी शहर संपूर्ण पणे बंद ठेवून गारगोटी गावच्या सीमा सर्वासाठीच बंद ठेवायला हव्यात. याचे काटेकोर पालन व्हायला हवे . अशी मागणी होत आहे.

भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर गावात अजूनही असा सन्नाटा पसरला आहे.

error: Content is protected !!