गुरुजनांनीच समाज जागरणाची जबाबदारी स्वीकारावी – प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

वारणानगर/प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा गुणगौरव केला. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी गुरुजनांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.


रसायनशास्त्र विभागाच्या वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमात पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी महाविद्यालयाला रसायनशास्त्रातील 18 संदर्भ ग्रंथ आणि तीन सिलिंग फॅन भेट देऊन गुरुजनांचा गुण गौरव केला. यानिमित्ताने सदिच्छा समारंभ ही संपन्न झाला.
स्वागत प्रास्ताविक प्राजक्ता खोत, प्रथमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सिद्धी मालवणकर, साक्षी चव्हाण, वैभव पाटील, सौरभ मायंदे, ऋतुजा शेटे, अक्षय पुजारी, रसिका केकरे यांनी केले. योगेश डवरी यांनी आभार मानले.
यावेळी विभाग प्रमुख एम.जी. चिखलकर, डॉ. बी. एस. शिर्के, डॉ. सत्यनारायण आरडे, डॉ. राजकुमार पांडव, प्रा. यु.डी. कदम उपस्थित होते.
दरम्यान महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाकडील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी गुरुजनांचा परिचय करून देताना गुरुजींचा जीवनपट उलगडून दाखविला.
प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर या वेळी म्हणाले की, “काळानुरूप गुरुजींचे महत्त्व बदलत असले तरी गुरुजनांची जबाबदारी वाढले आहे. आजच्या विपरीत परिस्थितीत गुरुजनांनीच समाज जागरणाची जबाबदारी स्वीकारावी. राष्ट्र जडणघडणीच्या कार्यात गुरुजनांचा मोलाचा वाटा असून विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रेम, स्वावलंबन आणि समाज उपयोगी कार्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य गुरुजनांनीच करावे”, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाविद्यालय कुशलतेने प्रगतीपथावर पोचवल्याबद्दल सर्वच गुरुजनांनी प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी प्रा. ए. जे. पाटील, प्रा. एस. आर. घोडके, समन्वयक डी.ए. खोत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम संयोजन डॉ.प्रीती शिंदे- पाटील यांनी केले. आभार सानिका लोहार हिने मांनले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!