हातकणंगले / ता : १५
स्वतःच्याच दोन लहान मुलांना बळजबरीने पंढरपूरला पळवून नेत असताना मुलाच्या आईला व तिच्या तीन साथीदारांना पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले. पूजा संदीप इंगळे , प्रभाकर राजू क्षीरसागर , साजन जीवन माने व सुरज बाळासाहेब कांबळे अशी कारवाई केलेल्या संशयितांची नांवे आहेत . ही कारवाई आज दुपारी बाराच्या दरम्यान सांगली -कोल्हापूर मार्गावर मजले (ता.हातकणंगले ) गावच्या हद्दीत केली . कारवाईत स्विफ्ट कार जप्त केली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की सदर बाजार कोल्हापूर येथून आजी-आजोबांकडे राहणारे सन्मेत इंगळे (वय-८ वर्ष ) व श्लोक इंगळे (वय-४वर्ष ) हे यांना त्यांची आई पूजा संदीप इंगळे व तिच्या तीन साथीदारांनी स्विफ्ट गाडी नंबर एम एच 13 एन 6264 या गाडीत बळजबरीने घालून पंढरपूरला नेत होते. स्विफ्ट कार सांगलीकडे भरधाव वेगाने जात असल्याचा संशय हातकणंगले पोलिसांना आला पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला. पण सुसाट सुटलेली गाडी थांबली नाही. अखेर मजले येथे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन गाडी आडवी लावून थांबविली. सुरुवातीला संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.पण पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी बळजबरीने दोन मुलांना आणल्याचे कबूल केले .त्यानंतर हातकणंगले पोलिसांनी पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले . ही कारवाई उपअधीक्षक प्रणील गिल्डा पोलीस कॉन्स्टेबल नामदेव कचरे , राकेश इंदुलकर , रवींद्र जगताप , दिग्विजय देसाई , सागर पोवार , प्रांजल कांबळे , भूषण शेटे , सुरेश पाटील आदींनी केली.