कोल्हापूर/प्रतिनिधी
अनेक निराधार वृद्ध पुरुष व महिलांना मायेचा आसरा व सेवा देणाऱ्या माऊली केअर सेंटर ला संजय घोडावत फौंडेशनने सीएसआर फंड स्वरूपात कायमस्वरूपी मदत करण्याचे ठरविले आहे. यामध्ये निराधार वृद्धांसाठी अन्न-पाणी व त्यांच्या देखभालीचा सर्व खर्च संजय घोडावत फौंडेशन करणार आहे. माऊली केअर सेंटर हे अनेक दिवस झाले आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे याची माहिती मिळाल्यावर संजय घोडावत फौंडेशन नेहमीप्रमाणे मदतीस धावून आले आहे.

तसेच माऊली केअर सेंटर चे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक कदम यांनी या सेंटर चे नाव ”संजय घोडावत फौंडेशन संचलित माऊली केअर सेंटर” असे करण्याचे योजिले आहे. वृद्धाश्रम अनेक आहेत परंतु त्या वृद्धांची सुश्रुषा करून त्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य कोल्हापूर येथील माऊली केअर सेंटर करीत आहेत. २००९ साली दीपक कदम यांनी मित्राच्या नातेवाईकाच्या वडिलांची सेवा केली. यानंतर २०१२ साली लगेचच एक वृद्ध आजीची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. समाजसेवेचे बाळकडू त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाले. वृद्धांची सुश्रुषा करण्यासाठी त्यांनी २०१४ साली माऊली केअर सेंटर ची स्थापना केली व कोल्हापुरातील नाना पाटील नगरमध्ये प्रथमतः एका भाड्याच्या बंगल्यामध्ये त्यांनी केअर सेंटर उभारले. बघता बघता या सेंटर मध्ये वृद्धांची संख्या वाढू लागल्यामुळे त्यांनी संभाजीनगर बसस्थानकाशेजारी मोठ्या क्षमतेचे केअर सेंटर उभारले. ही सर्व सेवा ते आजअखेर मोफत पुरवत आहेत. कदम कुटुंबीय स्वतःच्या मिळकतीवर हे केअर सेंटर चालवितात. दीपक कदम यांना त्यांचा भाऊ राहुल,आई मंगल, वडील संभाजी, योगेश रनवरे, ओम ढोबळे मदत करतात.आजवर या केअर सेंटर च्या माध्यमातून ५०० हुन अधिक वृद्ध निराधार पुरुष महिलांची त्यांनी देखभाल केली आहे. या कार्याबद्दल प्रसिद्ध उद्योगपती संजयजी घोडावत यांनी दीपक कदम यास ”निराधारांचा श्रावणबाळ” म्हणून उपाधी दिली आहे.
ज्या ज्या वेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला मदतीची गरज भासली आहे त्या त्या वेळी संजय घोडावत फौंडेशन ने मदतीचा हात पुढे केला आहे.
फौंडेशनने आजवर अंधअपंग शाळा, पूरग्रस्त, अनाथालये, दुष्काळग्रस्त शेतकरी, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्यकेंद्रे, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय खेळाडू, गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असताना भारतात देखील या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशा कठीण समयी मजूर, बेघर वसाहत, झोपडपट्टी, ऊसतोड कामगार, रोजंदारी कामगार यांची अन्नाची परवड होऊ नये म्हणून संजय घोडावत फौंडेशन ने या कोरोना काळात २ महिने मोफत अन्न पुरविले. यामध्ये ५ लाखाहून अधिक लोकांना अन्न पुरवठा, ८० हजाराहून अधिक कुटुंबियांना रेशन पुरवठा, ६० हजाराहून अधिकांना फूड पॅकेट, ३० हजारांहून अधिकांना हॅन्ड ग्लोव्हज चे वाटप, १५ हजारांहून अधिक सेवकांना भोजन व्यवस्था, १० हजाराहून अधिकांना फेसमास्क चे वाटप करण्यात आले आहे. याचबरोबर ६ हजाराहून अधिकांना मोफत समुपदेशन, ६०० हुन अधिक आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट चे वाटप करण्यात आले आहे. अहमदाबाद, बेळगाव, हुबळी, कोल्हापूर व सांगली याठिकाणी १४ हुन अधिक कम्युनिटी किचन चा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला. घोडावत फौंडेशन ने मनुष्याप्रमाणे प्राण्यांच्या संगोपन व खाद्याची जबाबदारी पेलत ५ हजाराहून अधिक प्राण्यांना जीवदान दिले आहे. याव्यतिरिक्त घोडावत फाऊंडेशनने लॉकडाऊन च्या काळात वृक्ष संवर्धनाकडे ही लक्ष देत सांगली ते शिरोळ रस्त्यावर सुमारे १० हजार वृक्षांना दररोज टँकर ने पाणी देत संगोपन केले आहे. एकंदरीतच कोरोना च्या कठीण काळात मनुष्य, प्राणी व वनस्पती यांना जगवून त्यांना मायेचा उबारा देण्याचे दातृत्व उद्योगपती संजय घोडावत यांनी दाखविल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
गतवर्षी संजय घोडावत यांनी संजय घोडावत विद्यापीठाच्या ५ इमारती कोरोना रुग्णांसाठी दिल्या आहेत. यामध्ये २ इमारतीमध्ये जवळपास ५०० हुन अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत होते तर उरलेल्या ३ इमारतीमध्ये संशयितांना आयसोलेशन व इन्स्टिटयूट क्वारंटाईन केले जात आहे. जवळपास आजवर घोडावत कोव्हीड सेंटर मधून २३००० हुन अधिक रुग्ण बरे होऊन सुखरूप आपल्या घरी पोहचले आहेत. यावर्षी देखील ३५० बेड क्षमतेचे संजय घोडावत कोव्हीड सेंटर नव्याने सुरु करण्यात आले आहे.यासोबतच ९० ऑक्सिजन बेड ची सोय करण्यात आली आहे.
२०१९ साली राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असताना पंचगंगा, कृष्णा व वारणा नदीच्या विळख्यात लोक अडकून त्यांची दुरावस्था झाली होती. अशा कठीण परिस्थितीत घोडावत ग्रुप व संजय घोडावत विद्यापीठाने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना मोफत प्राथमिक आरोग्यसुविधा, अँब्युलन्स,अन्न-पाणी, बस सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. तसेच जनावरांसाठी चारा ,निवारा आणि जे लोक पुरक्षेत्रात अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पूर ओसरेपर्यंत अन्न व निवारा देण्यासाठी घोडावत फौंडेशनने युद्धपातळीवर काम केले आहे.