हेरले / दि : १३

हेरले ( ता हातकणंगले ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज बिलाची होळी करून तलाठी एस ए बरगाले यांना तीन महिन्याचे वीज बिल सरसकट माफ करावे . अशा आशयाचे लेखी निवेदन महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्याराणी पाटील यांनी दिले.
निवेदनात मागणी केली आहे की ,कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीज बिलाची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. एप्रिल महिन्यापासून पाच ते पंधरा टक्के बिलामध्ये वाढ झालेली आहे. तसेच एकूण तीन महिन्याचे युनिट बिलामध्ये समाविष्ठ झाल्याने जादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी सुरू असून रोजगार देखील बुडालेला आहे. व्यापारीपेठेतील मंदीमुळे कामगार वर्गांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे बंद पडलेली आहेत. यातच घरगुती वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती वीज बिलांमध्ये झालेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ही वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे तीन महिन्याचे वीज बील सरसकट माफ करण्यात यावे. वीज माफीची जी काही रक्कम होईल ती रक्कम अनुदान म्हणून महावितरणला राज्य सरकारने द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थकीत वीज बिलांची वसुली करू नये. जबरदस्तीने वसुली केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या महेरणीगा जमादार , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस मुनिर जमादार,उपसरपंच राहुल शेटे ,माजी उपसरपंच संदीप चौगुले,दादासो कोळेकर ,श्रेयश हणमंत सह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.