आई-वडिलांचा सन्मान हाच मुलांचा धर्म – वसंत हंकारे

रुईत सह्याद्री फौंडेशनच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजन

रुई /राकेश खाडे

    आयुष्यातील तुमच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने ताठ मानेने जगणारा बाप खाली मान घालून समाजात फिरत असतो. आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या बापाला कधीही मान खाली घालू देऊ नका. त्याला ताठ मानेनेच जगायला द्या. कारण आई-वडिलांचा सन्मान  हाच मुलांचा धर्म आहे असे भावनिक आवाहन प्रा. वसंत हंकारे यांनी केले. 
   येथील सह्याद्री युवा फौंडेशनच्या वतीने न समजलेले आई आणि बाप या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. मंगलधामच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास महिला आणि विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

   गावामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान सह्याद्री युवा फौंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त करण्यात आला. सुरुवातीला प्रतिमापूजन प्रमुख पाहुणे त्याचबरोबर सरपंच शकिला कुन्नूर, शालन बेनाडे,कल्पना धड्डे, दिपाली सकटे, अश्विनी पोवार, डॉ.अफसाना मुजावर, वेदिका आवटे, सिरीन नदाफ, गौरी चव्हाण, सविता हुल्ले, श्रीदेवी खुळ
शालन साठे, विजयीश्री कागवाडे, करिश्मा मुजावर
ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत झाले. स्वागत पत्रकार मनोज अथणे तर प्रास्ताविकात सागर खाडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संजय खुळ यांनी करून दिला. प्रमुख वक्त्यांचा सत्कार सह्याद्री ग्रुपचे अवधूत कुलकर्णी आणि सर्व सहकारी यानी केला. यावेळी भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन कमलाकर याचा सत्कार देखील वसंत हंकारे यांच्या हस्ते करण्यात आला.
हंकारे म्हणाले, एखाद्या दिवशी आईची किंवा बापाची जीव ओतून सेवा करा त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे सौंदर्य दिसेल ते जगातील सर्वश्रेष्ठ सौंदर्य असेल. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाप एखादा गुंठा विकेल, एखाद कर्जही काढेल आणि तुम्हाला शिकवेल. परंतु मोठे झाल्यावर आपण याच बापाची किंमत ठेवायला शिका. दहावी, बारावी, डॉक्टर, इंजिनिअर झाला नाही तरी चालेल पण आयुष्यात कधीच तुमच्या बापाला मान खाली घालावे लागेल असे काम करू नका. तुमच्या एका वागण्याने जिवंतपणी बापाची चिता जळत असते. तो रोज मरत असतो आणि त्याची तिला रोज अग्नी देण्याचे कार्य तुमच्या हातून होत असते. जिवंतपणीच असणारे मरण खूप वाईट असते त्यामुळे आई-वडिलांचा सन्मान हाच आपला धर्म समजून त्यांची सेवा करत रहा
कार्यक्रमाचे आभार सुरेश चौगुले यांनी मानले. सूत्रसंचालन अमोल निर्वाणेसर यांनी केले. यावेळी गावातील आणि परिसरातील महिला,युवती यांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती.

error: Content is protected !!