तत्पर आरोग्य सेवा मिळण्यासाठी कोव्हीड सेंटर सुरु करणेची मागणी …

रुकडी / प्रतिनिधी

   कोरोना साथीच्या रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे.अशावेळी रुकडीसह परिसरातील गावातील कोरोनाग्रस्त नागरीकांना तत्पर आरोग्य सेवा मिळण्यासाठी सर्व सोयीनियुक्त असे कोव्हीड सेंटर सुरू करावे . अशी मागणी नागरीकांच्यावतीने माजी उपसरपंच अमितकुमार भोसले यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

     निवेदनात म्हटले आहे,सध्या आरोग्य पथकाला सेवा देताना अडचणी व मर्यादा येत आहेत. त्याबरोबर महाराष्ट्र शासनाचे मंजुर झालेले रुकडी येथील ‘ग्रामीण रुग्णालयाचे’ जागे अभावी उभारणी काम थांबले आहे. ग्रामीण रुग्णालय असते तर अनेक गोरगरीब लोकांच्या आरोग्याची हेळसांड झाली नसती असा मतप्रवाह नागरीकांमधून उमटत आहे. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, व्यापारपेठ, बाझारपेठ व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेल्या गावची लोकसंख्या २५००० हून अधिक आहे.या गावासाठी ग्रामीण रुग्णालय मंजूर होवून मोठा कालावधी लोटला आहे.परंतू आज अखेर जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालय उभारणीचे काम रखडले आहे.गावात सुसज्य ग्रामीण रुग्णालय असते तर बऱ्याच वेळा ग्रामस्थांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर, इचलकरंजी व इतर शहरांचा आधार घ्यावा लागला नसता.परिणामी कोरोना महामारीच्या धर्तीवर स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.याच बरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा यांना तोंड द्यावे लागते. त्यांनाही शासनाच्या जाचक अटीमुळे, नियमामुळे वैद्यकीय सेवा देताना मर्यादा येत आहेत. ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने गोरगरीब,मोलमजुरी करणारे,कष्टकरी,रोजंदारीवर काम करणारे अशा वर्गातील लोकांना खर्च न परवडण्यासारखा आहे. तरी सदर मागणीचा गांभीर्याने विचार करुन तात्काळ कोव्हीड सेंटर सुरु करुन नागरीकांना दिलासा द्यावा . अशी विनंती निवेदनाद्घारे केली आहे.

error: Content is protected !!