जोतिबा देवस्थान विकासासाठी भरघोस निधी

  मोठ्या संख्येने राज्यातून भाविक कोल्हापूरच्या जोतिबा देवस्थानला (Jyotiba Temple) येत असतात. त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर परिसराचा विकास व्हावा, यासाठी जोतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. यामुळे जोतिबा परिसर विकासाला चालना मिळणार आहे.

अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात (Budget Session) तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जोतिबा देवस्थानला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जोतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येईल.

त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पहिली समिती, पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील दुसरी समिती, उच्चाधिकार समिती आणि शिखर समितीच्या (Summit Committee) मान्यतेबाबतची कार्यवाहीदेखील गतीने करण्यात येईल.’’ दरम्यान, २५ फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने जोतिबा परिसर विकासासाठी सुमारे १५५० कोटींच्या निधीचा प्रस्ताव राज्य नियोजन विभागाला दिला आहे.

जोतिबा देवस्थान व परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापनेची घोषणा गेल्या अधिवेशनात झाली होती. त्याची दखलही या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतली नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. विनय कोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी प्राधिकरणाची घोषणा केली.

जोतिबा परिसर विकास प्राधिकरणासाठी जिल्हा प्रशासनाने १५५० कोटींचा प्रस्ताव राज्य नियोजन विभागाला पाठविला आहे. यामध्ये १९ गावांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात गिरोली, पोहोळे, दानेवाडी, कुशिरे, केखले, जाखले, सादळे-मादळे, माले, केर्ली आदी नऊ गावांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी १४० कोटींची मागणी आहे. यामध्ये मूळ जोतिबा मंदिर, पार्किंग, प्रसादालय व मेगा किचन, भक्ती निवास, प्रवेशद्वार, पिण्याची पाणी योजना करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पन्हाळा, बुधवार पेठ, बहिरेवाडी, बोरपाडळे, पोखले आदी पाच गावांचा समावेश आहे.
या टप्प्यासाठी ८०० कोटींच्या निधीची मागणी आहे. यात उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सेंट्रल प्लाझा, रँप, सुसज्ज बसस्थानक करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कासारवाडी, शिये, वडगणे, निगवे दुमाला, भुये या पाच गावांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी ३२० कोटींची मागणी असून, यामध्ये केदारलिंग गार्डन, मेडिटेशन सेंटर, नवे तळे, परिसर विकास, वनविकास, फुलपाखरू उद्यान करण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी २९० कोटींची मागणी असून, यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यटन विकास प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

error: Content is protected !!