पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्याने पत्नीने ३ वर्षांच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या

नांदेड / वृतसेवा

    करोना संकटकाळात नांदेड जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. करोना संसर्गाने पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच, पत्नीनेही अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

  नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही हृदयद्रावक घटना घडली. मूळचे आंध्र प्रदेशातील शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी आणि दोन मुली, एका मुलासह राहत होते. शंकर हे अँटिजेन चाचणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला.

  शंकर यांच्या मृत्यूची माहिती पत्नी पद्मा गंदम यांना समजली. त्यांना तो धक्का सहन झाला नाही. त्यांनी तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन लोहा परिसरातील तलावात उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. गंदम दाम्पत्याच्या मृत्यूनंतर मात्र, त्यांच्या दोन चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत. या घटनेने लोहा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!