इचलकरंजी/ता : २६
मागील महिन्याभरापासून शहरात सुरु असलेल्या कोरोनाच्या श्रृंखलेत शनिवारी 28 तर मागील सहा दिवसात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्ट लॅबमध्ये तपासणी केलेल्या 93 मिळून एकूण 121 कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजअखेर बाधित रुग्णांची संख्या 703 झाली आहे. तर कोरोना बाधितांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याने बाधित मृतांची संख्या 36 झाली आहे. तर आज प्राप्त अहवालामध्ये शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलिस कर्मचार्याचा समावेश आहे. तर खाजगी लॅबमधून प्राप्त अहवालात एका नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजते.
शहरात कोरोनाने महिन्याभरापासून थैमान घातले आहे. दररोज बाधितांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. काल 86 बाधितांची भर पडल्याने संख्या 582 वर पोहोचली होती. शनिवार दिवसभरात त्यामध्ये 36 जणांची भर पडल्याने ही संख्या 618 झाली आहे. 94 जणांनी कोरोनावर मात केली असून 490 जणांवर उपचार सुरू आहेत. लाखेनगर आणि जुना चंदूर रोड परिसरातील दोघांचा मृत्यू झाल्याने बाधीत मृतांची संख्या 36 झाली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नारायणपेठ परिसरातील 4, विकासनगर परिसरात 3, भोनेमाळ, लायकर चित्रमंदिर परिसरात प्रत्येकी 2 तर सोडगे मळा, लंगोटे मळा, जवाहरनगर सोमनाथ गल्ली, पाटील मळा, विक्रमनगर, शांतीनगर, मथुरानगर, महादेवनगर, सरस्वती मार्केट, जवाहरनर नौकुडकर गल्ली, तांबेमाळ, नदीवेस नाका, अवधुत आखाडा, अडत पेठ, राजराजेश्वरीनगर व सांगली नाका परिसरात प्रत्येकी 1 असे 27 रुग्ण मिळून आले आहेत. तर जवाहरनगर वीर गल्ली परिसरातील 56 वर्षीय पुरुष आणि लाखेनगर परिसरातील 50 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान कबनुर येथील बाधीतांची संख्या 26 झाली असून त्यापैकी 46 वर्षीय एका बाधिताचा आज मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 2 झाली आहे. तर शहापूर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने त्याच्या संपर्कातील 14 जणांचा खबरदारी म्हणून त्यांचे स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.