इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय ‘कोविड 19 ‘ विलगीकरण रुग्णालय – जिल्हाधिकारी दौलत देसाई. आम . प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांना यश ….

इचलकरंजी /ताः १०- प्रतिनिधी

        येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार देण्यास होत असलेली टाळाटाळा, कोविड रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण यासह विविध अडचणी संदर्भात आम . प्रकाश आवाडे यांनी केलेल्या तक्रारीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे.

         त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय अत्यंत चांगल्या पध्दतीने चालविण्यासह कोविड मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्यावर आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे पूर्णवेळ ‘कोविड 19 विलगीकरण रुग्णालय’ करण्यात आले आहे. परंतु याठिकाणी सुविधा आणि बेडची उपलब्धता असतानाही रुग्णांना दाखल करुन घेण्याऐवजी विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे उपचार मिळत नसल्याने कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालल्याने शासनाने या संदर्भात गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच हे रुग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आम. प्रकाश आवाडे यांनी रविवारी कराड येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती.

       आज सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांना आदेश जारी केला असून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांचे मुख्यालय हे इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले आहे. या आदेशात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आदेश प्राप्त झालेपासून आपले मुख्यालय इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय येथे स्थलांतरीत करावे. त्यांनी या रूग्णालयात पूर्णवेळ उपस्थित राहून रूग्णालयात दाखल रूग्णांच्या उपचारावर नियंत्रण ठेवण्यासह कोविड रूग्णांचे मृत्यु होणार नाहीत . त्याचबरोबर रूग्णांना तातडीने उपचार मिळतील यावर स्वत: लक्ष ठेवायचे आहे. आवश्यकता भासल्यास गंभीर रूग्णांवर स्वत:च्या देखरेखीखाली उपचार करून घ्यावेत. त्याचप्रमाणे या रूग्णालयाचे व्यवस्थापन तसेच त्यांच्या अधिकाराखालील जिल्ह्यातील सर्वच रूग्णालये व विविध आदेशाने दिलेली सर्व कामे इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय येथूनच करावयाची आहेत. कोविड 19 बाधित रूग्णांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अधिकाराखालील रूग्णालयातील वैद्यकिय अधिकार्‍याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास, वैद्यकिय उपचारातील हलगर्जीपणाने मृत्युचे प्रमाण वाढल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा शल्यचिकित्सकच जबाबदार राहतील असेही नमुद केले आहे.

       शासकीय रुग्णालय असल्याने याठिकाणी आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध होणार . अशी नागरिकांची अपेक्षा असताना रुग्णालय प्रशासनाच्या धोरणामुळे उपचार मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. परंतु आम . आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु व्हावे . यासाठी पाठपुरावा सुरु केला असून कोविडच्या संकटात रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा व उपचार मिळावेत यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने त्यांच्या प्रयत्नाला यश आले.

error: Content is protected !!