चांदोली धरणातून आज बुधवार दि.२६ रोजी सकाळी ११.३० वा. पासून वक्रदरवाज्यातून २४५६ क्युसेसने विसर्ग सुरु केला असून, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती पाटबंधारे कोडोली विभागाचे सहा.अभियंता मिलींद किटवाडकर यांनी दिली.

चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.जलाशय परिचलनसूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता वारणा धरण व्यवस्थापनाने धरणांतून चालू असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्रद्वार मधून १५४५ क्युसेक व विद्युत जनित्र मधून ९११ क्युसेक असे एकुण २४५६ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे असे मिलींद किटवाडकर यानी सांगीतले. ३४.४० टीएमसी क्षमता असलेल्या चांदोली धरणात २७.९६ टीएमसी पाणी साठा झाला असून ८१.२७ टक्के धरण भरले आहे. धरण क्षेत्रात आजपर्यन्त १००० मि.मी. पाऊस पडला असून पाणलोट क्षेत्रात १५९२६ क्युसेसने पाण्याची आवक झाली आहे यासाठी विसर्ग वाढवण्यात आल्याचे किटवाडकर यानी सांगीतले.
