कोल्हापूर, (जिमाका) :
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पूरबाधितांसाठी नियोजित निवारागृहांमधील सेवा सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्तांसाठीच्या नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिवसभर पाहणी करुन पदाधिकारी, नागरिक, ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पूरपरिस्थिती नियोजन बैठक घेण्यात आली, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, निवारागृहांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सेवा सुविधा, विद्युत पुरवठा यांसह आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. याठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होवू नये, याची दक्षता घ्या. या परिसरात स्वच्छता ठेवा, रोगराई पसरु नये, याकडेही आवर्जून लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जनावरांचे वेळेत स्थलांतर करण्याकडे लक्ष द्या. जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये सेवाभावी संस्था, साखर कारखाने यांच्या माध्यमातून जनावरांसाठी पुरेसा चारा- पाणी उपलब्ध करुन ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, आजवरच्या पूरपरिस्थिती मध्ये सर्वांनी योग्य नियोजनातून परिस्थिती हाताळली आहे. यावर्षीही सर्वजण मिळून सामोरे जाऊया, असे आवाहन श्री बलकवडे यांनी केले.
मागील वर्षी जनावरांचे स्थलांतर करताना टेम्पो, ट्रक चालकांनी पूरग्रस्तांकडून जादा भाडे आकारले होते. यावर्षी असे घडू नये यासाठी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी आरटीओ व पशुसंवर्धन आयुक्त यांची संयुक्त समिती बनवली आहे. यामुळे लोकांना वाजवी दरात वाहन उपलब्ध होईल, असे उपविभागीय अधिकारी विकास खरात यांनी सांगितले.
घाबरु नका.. प्रशासन आपल्या सोबत*
- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला ग्रामस्थांना धीर
पूरपरिस्थितीमध्ये स्थलांतराची वेळ आल्यास आवश्यक साहित्य, महत्वाची कागदपत्रे घेऊन सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतरित होवून प्रशासनाला सहकार्य करा. जनावरांनाही वेळेत बाहेर काढून जीवित व वित्तहानी टाळूया.. घाबरु नका.. प्रशासन आपल्या सोबत आहे, असा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ तालुक्यात पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागणाऱ्या तसेच पूराचा वेढा पडून संपर्क तुटणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी नृसिंहवाडी मंदिर परिसर, एस.पी. हायस्कूल- कुरुंदवाड, आश्रम शाळा- तेरवाड, कुमार मराठी विद्या मंदिर- हेरवाड, गुरुदत्त साखर कारखाना- टाकळी, लालबहादूर शास्त्री हायस्कूल- कवठे गुलंद, पद्माराजे हायस्कूल- शिरोळ, दत्त पॉलिटेक्निक -शिरोळ, कुंजवन- उदगाव, घोडावत कॉलेज- जयसिंगपूर या पूरग्रस्तांच्या छावणी ठिकाणी जिल्हाधिकारी श्री रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट दिली.
यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ, गटविकास अधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस, बांधकाम, महावितरण, शिरोळ, जयसिंगपूरचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, मदत व पुनर्वसन पथक, एनडीआरएफ चे जवान, नागरिक उपस्थित होते.
