निकाल जाहीर करण्यासाठी 500 रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकाला अटक

राखून ठेवलेला निकाल जाहीर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला (Junior Clerk) रंगेहाथ अटक करण्यात आली. सोपान धोंडिराम माने (वय ५४, रा. मसुटे कॉलनी, प्लॉट नंबर दोन- ए, सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मूळ रा. नेवरी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Bribery Department) काल सायंकाळी ही कारवाई केली. उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले की, तक्रारदार हा शिवाजी विद्यापीठाशी (Shivaji University) संलग्न न्यू लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे. तो सध्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. त्याने उत्तरपत्रिका लिहिताना भाषेतील त्रुटी ठेवल्या आहेत. त्यामुळे त्याचा निकाल राखून ठेवला आहे. मात्र, हा निकाल जाहीर करण्यासाठी शुल्क म्हणून सोपान माने याने तक्रारदार विद्यार्थ्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने पाचशे रुपये लाच म्हणून दिले, ते माने याने स्वीकारले. त्यामुळे त्याला सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली. कारवाईनंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी कोल्हापुरात आणि सांगली येथील मूळ घरी सुद्धा झडती घेण्याचे काम सुरू केले आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल संदीप पवार, प्रकाश चौगले, सूरज अपराध यांच्यासह अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

error: Content is protected !!