पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर यांना केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक जाहीर

हातकणंगले /ताः १३-मिलींद बारवडे

पोलीस अधिक्षक
ज्योती क्षीरसागर

        तुरची – तासगांव ( जि.सांगली ) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती ज्योती क्षीरसागर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक जाहीर झाले आहे. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
         सन २०११ मध्ये बीड जिल्हयातील आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील केरुळ या गावी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातुन अतिशय संवेदनशिल खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये बाळू ऊर्फ रविंद्र खाकाल याचा तलवारीने वार करुन खुन केला होता. खाकाल यांच्यावर एकूण २९ वार केले होते. यावरुन आष्टी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४९/११ भा.द.वि. कलम १४७, १४८, १०९, २१२, २०१.

       ३०७, १२० (ब), ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता . सदरच्या गुन्हयाचे स्वरुप गंभीर व संवेदनशील असल्याने तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई श्रीमती ज्योती क्षीरसागर यांच्याकडे सदरच्या गुन्हयाचा तपास वर्ग करण्यात आला होता. जिल्हयाची कायदा ,सुव्यवस्था व सदरचा गुन्हा अतिशय क्लिष्ट व किचकट असताना
        सुध्दा त्यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा आधार घेवुन यातील १७ आरोपींना अटक करुन, त्यांच्याविरुध्द परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक सबळ पुरावा जमा करुन त्यांच्या विरोधात मुदतीत दोषारोपपत्र अतिरीक्त सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
      २०१२ ते २०१९ या कालावधीच्या न्यायालयीन सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली . त्यांनी राजकीयदृष्टया अतिशय संवेदनशील गुन्हयाचा कौशल्याने तपास करुन गुन्हा उघडकीस आणून आरोपींना गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली. त्यांनी यापुर्वी अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास केला असल्याने त्यांना केंद्र शासनाच्या केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट अन्वेषण व अपराध सिध्दीबाबतचे पदक (UNION HOME MINISTERS MEDAL FOR EXCELLENCE IN INVESTIGATION) जाहीर झाले आहे. पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव गावच्या कन्या असून,त्यांनी यापूर्वी नगर, बीड, सी.आय.डी अशा विविध ठिकाणी उत्कृष्टरित्या सेवा बजावलेली आहे. सध्या त्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची-तासगांव ( जि. सांगली ) या ठिकाणी प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत.

error: Content is protected !!