आळते मध्ये कलश यात्रा उत्साहात संपन्न

जिवंत देखावा व हत्ती या प्रमुख आकर्षणामुळे सर्वत्र कौतुक

आळते/प्रतिनिधी

शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामाचे मंदिर अयोध्या मध्ये पूर्णत्वास आले आहे. 22 जानेवारीला मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या भव्य समारंभाच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदू समाजाच्या वतीने आळते (ता हातकणंगले) येथे अक्षता कलश व निमंत्रण पत्रिका यांचे पूजन व शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने रामभक्त व महिला या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.

गावाच्या वेशीपासून गावातील सर्व राजकीय मंडळी पदाधिकारी रामभक्त यांच्या हस्ते या शोभा यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. विराचार्य ढोल ताशा पथक, पारंपरिक वाद्ये, सजवलेली बैलगाडी, भजनी मंडळ, साऊंड सिस्टिम, लाईट शो, जिवंत देखावा, हत्ती, रथ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, भगवान श्रीरामांची भव्य मुर्ती या सर्व प्रमुख आकर्षणामुळे सर्वत्र या शोभायात्रेचे कौतुक झाले.

गावामध्ये सगळीकडे भगवे झेंडे व मिरवणूक मार्गावरती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावच्या वेशीपासून भजनी मंडळाने भजन व अभंगाने गावातील वातावरण भक्तीमय केले. जिवंत हनुमान देखावा हा शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरला. रथा मध्ये भगवान राम, लक्ष्मण व सीता यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. अक्षता कलश व पत्रिका यांची हत्तीवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला.

  वेशीपासून सुरुवात करून गावप्रदक्षिणा काढण्यात आली. प्रत्येक गल्लीमध्ये महिलांनी कशाचे पूजन केले. हनुमान मंदिरामध्ये आरती करून या शोभायात्रीची सांगता करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने राम भक्त, महिला, तरुण मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!