कीर्तनकार पांडुरंग वाटेगावकर यांचे निधन

इस्लामपुर /ताः २७

         बोरगाव (ता. वाळवा ) येथील जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. पांडुरंग दौलू वाटेगावकर (वय 96)यांचे सोमवार दि.27 जुलै 2020 वृद्धापकाळाने निधन झाले.ज्ञान,वैराग्य व भक्ती ही संत लक्षणे अंतर्भूत असणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे पांडुरंग महाराज. कीर्तन, प्रवचन,भजन यांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 76 वर्षे लोकप्रबोधनाचे काम केले.नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी,या उक्तीप्रमाणे त्यांनी प्रबोधनातून अंधश्रद्धा, रूढी, परंपरा,व्यसनाधीनता,कर्मकांड ह्याविरोधात बंड पुकारलं.महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवात त्यांनी अनेक वर्षे कीर्तन ह्या लोककलेचे प्रसारण केले.बोलीभाषेतील समर्पक उदाहरणे, यमकमय वाक्यरचना, संतवाणीचे साध्या सोप्या भाषेत विश्लेषण ही त्यांच्या प्रबोधनाची वैशिष्ट्य होती.जीवनाचे साधे सोपे तत्वज्ञान त्यांनी संत अभंगांचे प्रमाण देऊन जनमानसावर बिंबवले.साधी राहणी, निरपेक्षवृत्ती,अफाट पाठांतर,प्रभावी वक्तृत्व ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची बलस्थाने होत.पंढरपूरच्या पांडुरंगाची महिन्याची वारी,माऊलींचा पालखी सोहळा,ठिकठिकाणच्या ज्ञानेश्वरी पारायणात कीर्तन, प्रवचन करत महाराष्ट्रभर भ्रमंती असे विरक्त जीवन ते जगले. त्यांनी वाचन,चिंतन, मनन,नामस्मरण इ.साठी आयुष्य वेचले.
          संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाची साधना करीत, वासकर फडाची सेवा करीत त्यांनी आयुष्य वेचले.पूर्वीच्याकाळी चालत नंतर बसने वगैरे जाऊन निरपेक्षवृतीने , प्रवचन, कीर्तन , भजनरुपीसेवा दिली.प्रत्येक क्षण नामचिंतन अभंग, ओवी, यांचा अभ्यास करत आपल्या जीवनाचा प्रवास करणारे हे वैकुंठ भूमीचे पांथस्थ म्हणजे पांडुरंग बुवा वाटेगावकर. वारकरी संप्रदायाची परंपरा जपताना त्यांच्यावर असंख्य संकटे आली. सुखदुःखे समे कृत्वा | लाभा लाभो जयाजयौ || अशी वृत्ती ठेऊन त्यांनी परमार्थ फलद्रुप केला.अखंड ज्ञानसाधना, साधी राहणी, मिळेल ते खाणे, आपल्या साध्या सोप्या विनोदी, मार्मिक भाषेत परमार्थाचे महाधन वाटणे हे व्रत त्यांनी जोपासलं.ज्ञानेश्वर माऊलींच्या
    ‘ते पुरुषार्थ सिद्धी चौथी | घेऊनि आपुल्या हाती |
            रिगाला भक्ती पंथी |जागा देतू |,या ओवीप्रमाणे त्यांचे समग्र जीवन होते.आबासाहेब वासकरच्या बरोबर परमार्थाचा रथ ओढण्याचं भाग्य त्यांना लाभलं.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मुलगी,सून, नातवंडे, असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी तुकाराम वाटेगावकर यांचे ते आजोबा होत . रक्षाविसर्जन बुधवार दि 29 जुलै 2020 रोजी बोरगाव येथे आहे  

error: Content is protected !!