कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी – अभियंता कुमार पाटील

पाटण / ता. १४ विक्रांत कांबळे

कोयना पाणलोट धरणांतर्गत अचानकपणे पावसाचा जोर कमी होवून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने शुक्रवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातून विनावापर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. तथापि धरण पायथा वीजगृहातून सकाळी एक व संध्याकाळी दुसरे अशी दोन्ही जनित्रे सुरू करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार होते . परंतु तांत्रिक बिघाडामुळे ही जनित्रे बंद ठेवण्यात आली , असून शनिवारी ती कार्यान्वीत करण्यात येतील . पावसाचा जोर वाढून पाण्याची आवक वाढली , तर कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले.

धरणात सध्या एकूण 83.36 टि. एम. सि. पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी सकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 तर दुपारनंतर धरणाचे सहा वक्री दरवाजे 9 इंचांनी वर उचलून त्यातून 3700 असे दोन्ही ठिकाणाहून प्रतिसेकंद एकूण 5800 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याची तयारी करण्यात आली. दरम्यानच्या काळात धरणातंर्गत विभागात अचानकपणे पावसाचा जोर कमी होवून पाणी आवकही घटली. पाणी आवक ही प्रतिसेकंद सरासरी 60 ते 82 हजार क्युसेक्स पर्यंत गेली होती . पण नंतर ती सरासरी 41389 क्युसेक्स इतकी झाल्याने धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला. शुक्रवारी सकाळी धरण पायथा वीजगृहातील एक जनित्र सुरू करून त्यातून 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. संध्याकाळी दुसरे जनित्र सुरू करून दोन्ही जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स विसर्ग पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्याचा विचार होता . परंतू जनित्रांमध्ये बिघाड झाल्याने सुरू असलेले एक जनित्र बंद ठेवण्यात आले आहे. शनिवारी या जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे . यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पाणी आवक वाढली तर कोणत्याही क्षणी धरणाचे सहा वक्री दरवाजे गरजेनुसार वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने याबाबत संबधितांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात आवश्यक पाणीसाठा झाला आणि पूर्वेकडे पावसाचे प्रमाण, नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन पूराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही कुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.       

धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 41389 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे . येथे आता एकूण उपलब्ध पाणीसाठा 83.36 टि. एम. सि. यापैकी उपयुक्त साठा 78.36 टि. एम. सि. , पाणीउंची 2144.11 फूट, जलपातळी 653.771 मिटर इतकी झाली आहे. गुरूवार ते शुक्रवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 3.36 टि. एम. सि. ने तर पाणीउंचीत 3.9 फुटाने वाढ झाली आहे. चोवीस तासांतील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 98 मिलीमीटर ( 3032 ) , नवजा 98 मिलीमीटर ( 3369 ) , महाबळेश्वर 149 मिलीमीटर ( 3376 ) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!