अवघ्या पाच दिवसात घरफोडी उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर /ता.३१-प्रतिनिधी

      स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने समांतर तपास करून अवघ्या पाच दिवसात घरफोडी उघडकीस आणली. कारवाईत तब्बल साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित आरोपी संदेश रवींद्र फडके (वय-२०वर्ष . रा . माणगाव ता. चंदगड जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे . ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने केली.

संशयित आरोपी संदेश फडके

      याबाबत अधिक माहिती अशी की , माणगाव (ता. चंदगड ) येथील सात ऑगस्ट रोजी बंद घराचे कुलूप काढून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख३४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता . घरफोडीचा गुन्हा पंचवीस ऑगस्ट रोजी चंदगड पोलिस ठाण्यात नोंद झाला . फिर्यादी व्यक्तीने संदेश फडके याच्यावर संशय व्यक्त केला . स्थानिक गुन्हे शाखेने संशयित व्यक्तीवर पाळत ठेवून व विश्वासु बातमीदाराकडून माहिती घेऊन संशयित आरोपी फडके यास नेसरी बस स्टँड परिसरात सापळा रचून पकडले . त्याच्याकडून सोन्याचा पोहे हार , नेकलेस , लहान-मोठे अंगठ्या , झुबे , लहान-मोठ्या रिंगा , कानवेल व लॉकेट असे ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने व ५७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम पाच लाख रुपये असा एकूण साडेआठ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार सप्टेंबर पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली. पुढील तपास चंदगड पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते करीत आहेत .
      ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले , पोलीस कर्मचारी नरसिंग कांबळे , शिवाजी पडवळ , शिवाजी खोराटे , प्रल्हाद देसाई ,सचिन देसाई , संजय पडवळ , संजय चाचे रणजित कांबळे , सुरेश पवार ,रफिक आवळकर यांनी केलेली आहे.

कारवाईत जप्त केलेली सोन्या -चांदीचे दागिने व रोख रक्कम

error: Content is protected !!