तीस टक्के परताव्याचे आमिष, बारा कोटींची फसवणूक?; राष्ट्रीयीकृत बँकेतील प्रकार

तीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला श्रीकृष्ण बळवंत सुतार (रा. गारगोटी, ता. भुदरगड) याने सुमारे साठ गुंतवणूकदारांना बँकेच्या बनावट पावत्या देऊन सुमारे बारा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
तक्रार द्यावी तर पैसे बुडणार आणि कोर्ट कचेरीचा मनस्ताप, पैसे मिळतील याची खात्री नाही अशी गुंतवणूकदारांची स्थिती झाली आहे. आतापर्यंत सुमारे बारा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती गुंतवणूकदारांनीच एकत्रित केली आहे. ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. तक्रार देण्यासाठी अनेक जण पुढे आलेले नाहीत.
गारगोटी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत मानधन तत्त्वावर श्रीकृष्ण सुतार हा कामाला होता. सगळ्यांना नेहमी नि:स्वार्थीपणे मदत करायचा. दिसायला आणि वागायला अतिशय साधा सरळ. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचा विश्वास बसला. तो गेली आठ ते दहा वर्षे तिथे कामाला होता. त्याला खातेदारांची माहिती होती. त्याने त्यातील पैसेवाले हेरून एक डाव टाकला. मोजक्या ठेवीदारांना त्याने, बँकेने तीस टक्के परताव्याची योजना आणल्याचे सांगितले. तुम्ही इच्छुक असाल तर गुपचूप पैसे द्या, शाखाधिकऱ्यांना काही मोजक्याच लोकांना या योजनेत सहभागी करून घ्यायचे आहे. कारण जर सर्वांना समजले तर अनेक जण बँकेकडे ठेवी ठेवण्यासाठी येतील ही शासकीय बँक असल्याने कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे संख्या वाढल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही, असे सांगून पैसे घेतले.
याबाबत कोणालाही अगदी शेजारी, नातेवाईक यांना देखील भणक लागू दिली नाही. लोकांनी लाखो रुपये रोख, चेक, ऑनलाइन पद्धतीने त्याच्याकडे जमा केले. त्याने काही काळ परतावा दिल्याने लोकांचा विश्वास बसला. दरम्यान, या पावत्यांची मुदत संपल्यावर लोकांनी त्याच्याकडे तगादा लावला. त्याची चालढकल पाहून काही ठेवीदारांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यावर पावत्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मग त्यांनी कोल्हापूर येथील बँकेच्या मुख्य शाखेकडे धाव घेतली. तेथे तक्रार दाखल करण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगताच या भामट्याने दोन महिन्यांत पैसे देतो असे आश्वासन दिले. परंतु, ते न दिल्याने पोलिसांत तक्रार दाखल झाली

error: Content is protected !!