माढा परिसरात श्रीराम पुजन

माढा /ताः ५-प्रमोद गोसावी

          अयोध्या येथील श्री राम मंदीराच्या शिलान्यासाचे औचित्यावर श्रीराम पूजनाचे कार्यक्रम घरगुती स्वरूपात पार पडले . तर मानेगाव (ता . माढा ) येथील पुरातन काळापासूनच्या दुर्लक्षित श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धाराचा शुभारंभ करण्याचा मानस तेथील भक्तांचा होता . मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तो कार्यक्रम होऊ शकला नाही .

       माढा येथील कसबा पेठ येथील श्री रघुनाथ स्वामी यांचे तेरावे वंशज श्री योगीराज हरीभाऊ गोसावी यांचे वाड्यात पुरातन काळापासून श्री राम उपासना असून श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. श्री राम पंचायतनास महाअभिषेक करुन श्री रामरक्षा स्तोत्र व मारूती स्तोत्र म्हणून रामाचे भजन व महाआरती कुटुंबियां समवेत करीत आपला अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या शुभारंभाचा आनंद साजरा केला . तर कसबा पेठेतील रामकृष्ण मठातील श्रीराम मंदिरात सत्यनारायणाची पूजा करून आणि श्रीराम आरती, रामरक्षा पठण करीत आपला आनंद भाविकांनी व्यक्त केला . याच पद्धतीने कुर्डूवाडीत देखील या औचित्यपूर्ण शुभारंभाचा आनंद साजरा केला गेला . तर कारसेवकांचा गौरव कार्यक्रम मात्र होऊ शकला नाही . ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरासमोर रांगोळ्या काढून, घरावर भगवे ध्वज उभारून आजच्या शिलान्यासाच्या समारंभास समर्थन दिल्याचे आढळून आले .

         मानेगाव (ता . माढा) येथील पुरातन काळापासूनच्या दुर्लक्षित श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धाराचा शुभारंभ आजच्या मुहूर्तावर करण्याचे नियोजन तेथील नागरिकांनी केले होते . मात्र त्यासाठी पोलिस प्रशासनाने परवानगी न दिल्याने हा कार्यक्रम होऊ शकला नाही . येथे ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढून कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती . मात्र पोलिसांनी साध्या पूजेस देखील परवानगी नाकाल्याने ग्रामस्थ नाराज झाले .

error: Content is protected !!