सासू-सासर्‍यांनी केले सुनेचे कन्यादान, समाजासमोर एक नवा आदर्श

सुनगावमध्ये सासू-सासऱ्याने आपल्या सुनेचं कन्यादान समाजासमोर एक नवा आदर्श

बुलढाणा/ प्रतिनिधी

    बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका अनोख्या विवाहाची सध्या चर्चा सुरु आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावमध्ये एका सासू-सासऱ्याने आपल्या सुनेचं कन्यादान करत एक नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे. सुनगावमधील शालिग्राम वानखडे यांनी आपल्या सुनेचे कन्यादान करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

   सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाशी 16 मार्च 2020 रोजी धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा उमाळे या तरुणीसोबत विवाह झाला होता. परंतु दुर्दैवाने काही महिन्यातच 31ऑगस्ट 2020 रोजी संतोष शालिग्राम वानखडे याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे राधा ही आपले सासू सासऱ्यांकडेच राहत होती.

    सासरे शालिग्राम वानखडे व सासू वत्सलाबाई यांनी राधा हिचा आपल्या मुलीप्रमाणे सात ते आठ महिने सांभाळ केला. त्यानंतर काल राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार यांच्याशी सुनगाव येथे नोंदणी पद्धतीने विवाह करून दिला. अशा प्रकारचा विवाह म्हणजेच सासू-सासरे यांनी केलेले सुनेचे कन्यादान करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे, अशा शब्दात वानखडे दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. या विवाहासाठी राधाचे सासरे शालिग्राम यांनी सात ते आठ महिन्यांपासून प्रयत्न केला.

   या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह सुनगाव येथे पार पडला. अशा या आगळ्यावेगळ्या विवाहाची समाजातील प्रत्येकाने खरोखर प्रेरणा घ्यायला हवी. या अनोख्या विवाहाची जिल्हाभर चर्चा आहे.

error: Content is protected !!