मुंबई मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याबाबत चर्चा झाली. बैठकीत ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत देखील चर्चा झाली. ही सुविधा खर्चिक असली तरी देखील याबाबत नक्की प्रयोग करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
अंत्यसंस्कारच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा चांगला साठा उपलब्ध होईपर्यंत म्हणजेच आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरले पाहिजे यावर चर्चा झाली. तसेच, इंजेक्शनचा अनावश्यक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बरोबर सरकारी रुग्णालयाला थेट कंपनीकडूनच इंजेक्शन दिलं जाईल. तसेच, त्यांची रेट कॅपिंगही केली जाईल असे बैठकीत ठरले.
राज्यातील काही शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्सची उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. या संदर्भात एक-दोन दिवसात अर्थ विभाग आणि अन्य विभागाची चर्चा करण्यात येणार आहे.
वरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. तसेच बैठक संपल्यानंतर केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात बंदी केल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारचे आभारही व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनबद्दल कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.