शिरोली/ताः ३

फौंड्री वेस्ट सॅण्डच्या बांधकामातील गैरवापरावर कायदेशीर कारवाईच्या कक्षाच माहीत नसल्याने कारवाईसाठी आलेले महसूल अधिकारी कारवाई न करताच हात हलवत परतले. महसूल विभागाचे विशेष पथक आज पुलाची शिरोली, टोप, नागाव, शिरोली औद्योगिक वसाहत व शिये परिसरातील फौंड्री वेष्ट सॅण्ड डेपोची चौकशी करण्यासाठी जागेवर भेट देण्यास आले. यामध्ये मंडल अधिकारी बी. एल. जाधव तलाठी निलेश चौगले, युवराज केसरकर व जे. व्ही. चौगले यांचा समावेश होता.
सध्या नदीतील वाळू उपसा बंद आहे. कृत्रिम तुटवडा भासवून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये प्रती ट्रक किंमत आकारून बांधकाम करणार्यांना मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. याबाबत महसूल विभागाने चौकशी केली असता . नदीच्या पात्रातील वाळूत फौड्री वेस्ट सॅण्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मिक्स करून ही वाळू बांधकामासाठी पुरवली जाते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा भेसळयुक्त वाळूमुळे उभी राहणारी बांधकामे किती काळ टीकणार असा प्रश्न उपस्थित होतो. या वाळूची गुणवत्ता व दर्जा न तपासता याचा बांधकाम क्षेत्रात भरमसाठ वापर होत आहे. याबाबत वैयक्तिक स्वरूपात तक्रारी होत असल्याने महसूल विभागाने चौकशी सुरू केली. आज हे पथक सर्वप्रथम टोप येथील दक्षिणवाडी येथील डेपोमध्ये पोहचले. तेथील मजुरांनी वेस्ट सॅण्ड मधून स्क्रॅप गोळा करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर हे पथक शिरोली औद्योगिक वसाहतीमधील वेस्ट सॅण्डच्या मुख्य डेपोवर आले. मात्र हा डेपो औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत असल्याने आणि या जागेवर कारवाई करण्याचे अधिकार महामंडळाच्या प्रादेशिक अधिकार्यांना असल्याने हे पथक पुलाची शिरोली येथील वीट भट्टीच्या माळावर गेले. तेथे त्यांना एका व्यक्तीचा भ्रमणध्वनीवरून संपर्क झाला. त्यामुळे आजची कारवाई थांबली. दरम्यान नागाव आणि शिये येथे वाळू डेपो चालक पसार झाले. परिणामी कारवाई कुणावर करायची हा घोळ कायम राहिला. मात्र बांधकाम क्षेत्रात होणार्या फौंड्री वेस्ट वाळूच्या वापरामुळे धोका कायम असल्याने ही कारवाई आता वेगळ्या टप्प्यात होणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.