धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा खासदार करा – खासदार श्रीकांत शिंदें

‘शासनाच्या विविध लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम गतीने करावे. या माध्यमातून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी पक्षाची बांधणी भक्कम करुया’, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle LokSabha Constituency) विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी संवाद साधला. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदारसंघनिहाय पक्ष कार्याची सविस्तर माहिती घेतली.

ते म्हणाले,‘ राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार गतिमान असून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. ’ यावेळी काही मुद्यांवर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या. सक्रीय शिवसैनिकांना भक्कम पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खासदार शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ठाकरे गटाच्या युवती सेनाप्रमुख सलोनी शिंत्रे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाऊसाहेब चौधरी, योगेश जानकर, नरेश मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, आनंदराव पोवार, अविनाश बनगे, अनिल सुतार, सतिश मलमे, संतोष जाधव, रवि लोहार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!