नगराध्यक्ष – नागरिकात वाहतुक कोंडीतुन हाणामारी , नागरिक अवाक् ; अखेर पोलीस स्टेशनमध्ये तडजोड

हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर व ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांचे पती प्रकाश पाटील -नाधवडेकर यांच्यामध्ये वाहनांमुळे वहातुकीस अडथळा होत असल्याच्या कारणांवरून हाणामारी झाली. या दोघांमध्ये झालेल्या हाणामारीचा व झटापटीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. अखेर हाणामारीचे प्रकरण पोलीस ठाणेत गेल्यानंतर तडजोड होवुन त्यावर पडदा पडला.


आधिक माहिती अशी की , प्रकाश पाटील वैयक्तिक कामासाठी आपली कार घेवुन निघाले होते. कायमस्वरूपी गर्दी असलेल्या नगरपंचायचीजवळ आल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या दुचाकी वहानांमुळे वहातुकीची कोंडी झाली होती. पाटील यांनी गाडी जागेवरच लावुन नगरपंचायतीच्या कार्यालयात जावुन आरडाओरड केली.
त्याचवेळी नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर आपली कार घेवुन तिथे पोहचले. यावेळी वहातुकीच्या कोंडीवरून दोघात वाद झाला . यावेळी पाटील यांनी गाडी बाजुला घेत नसल्याचे सांगुन शिवीगाळ केली. शिवीगाळ ऐकुन जानवेकर यांनी पाटील यांना थोबाड लगावली. त्यावेळी चिडलेल्या पाटील यांनी नगराध्यक्षांच्या शर्टची कॉलर् पकडल्याने दोघांत झोंबाझोंबी झाली. त्यांचे तात्काळ कुणीतरी चित्रीकरण केले. अखेर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेल्याने त्यावर पडदा पडला. मात्र पदाधिकाऱ्यांवर नागरिकांतुन पहिल्यांदाच हात उगारल्याने हातकणंगले परिसरात दिवसभर चर्चेला ऊत आला होता.

error: Content is protected !!