पूर नियंत्रणासाठी उद्या मुंबईत बैठक – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे पाणी नियंत्रित (flood control) करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या ‘एमआरडीपी’ या प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्यात 4 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी उद्या मंगळवार (दि. 13) सकाळी 11 वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चार हजार कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल बांधणे, भूस्खलन उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरित करणे, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे, पूर संरक्षक उपाययोजना आदी कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये 70 टक्के हिस्सा जागतिक बँकेचा असून, 30 टक्के योगदान राज्य शासनाचे असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंगळवार, दि. 13 फेबवारीला सकाळी 11 वाजता मुंबई येथे मित्रा संस्था कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह देसाई, जागतिक बँकेचे प्रतिनिधी व संबंधित विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!