छाटू नका पंख मुलांचे…..

          आज एका ग्रुप वर एकांनी लिंक शेअर केली . झपाटलेपण ते जाणतेपण म्हणून मुलाखत होती, शारदा बापट यांची. बहुरंगी बुद्धी म्हणजे काय, बहुरंगी व्यक्तिमत्त्व कसं असावं किंवा कसं घडवावं या मुलाखतीतून शिकायला मिळाले. त्या विषयावरचा हा लेख.

             शारदा बापट यांनी लग्नानंतर वयाच्या ३५ व्या वर्षी मुलगा ९ वर्षांचा असताना डॉक्टर होण्याचा ध्यास घेतला आणि ते स्वप्न वयाच्या ४२ व्या वर्षी पूर्ण करून दाखवलं. प्रचंड इच्छाशक्ती आणि शांत डोक्याने केलेल्या विचारांच्या जोरावर आपण काय काय करू शकतो याचं त्या जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करत असतानाच प्रायव्हेट प्लेन पायलट कोर्स पूर्ण केला. त्या पियानो वाजवायला शिकल्या. त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला होता. कॉम्पुटर मध्ये पण त्या प्रवीण्य होत्या. तसेच इलेक्ट्रॉनिक्स हा पण त्यांचा एक विषय होता. त्यांना बहुरंगी बुद्धीचे रोल मॉडेल म्हणायलाही काही हरकत नाही.

           खरंतर आजच्या स्पर्धेच्या युगात आपण ऑल राउंडर होणं टाळतो. आपली शिक्षण व्यवस्था खूप परिश्रमपूर्वक बहुरंगी बुद्धी छाटून टाकते. ८वी किंवा ९वीच्या इयत्तेमध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांना आपण काय काय कमी करायला हवं, असं केल्यावर कोणाचं भलं झालंय का? एके ठिकाणी लक्ष केंद्रित कर, हेच सगळं ऐकवतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाला फुलूच देत नाही. खरंतर एका ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्याच्या हट्टापायीच आपण बहुरंगाने पसरणाऱ्या बुद्धिमत्तेचे बोन्साय करून टाकतो.आपण कधीच एका ठराविक जगाच्या बाहेर डोकावून पाहण्याचे कष्ट घेत नाही. आपण यशाच्या, आयुष्याच्या चौकटीबद्ध व्याख्या पाठ करून ठेवल्यात फक्त. आणि डोळ्यावर झापडं लावल्याप्रमाणे त्याच व्याख्यांच्या मागे धावतो नेहमी.मुलांना हवं ते करू द्या. त्यांच्या बुद्धिमत्तेला खत पाणी घाला. त्यांना व्यक्त होण्याची संधी द्या.बहुरंगी व्यक्ती बनण्यासाठी त्यांना घरातून, दारातून, चार भिंतीच्या बाहेरचं जग बघायला शिकवा, अनुभवायला घेऊ द्या.

       आपण आपल्याला हवं ते करावं. फक्त आपला स्वतःचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. बहुरंगी बुद्धिमत्तेला जर आपण खत पाणी घातले, जर त्याला वाव दिला तर ती बहुरंगी बुद्धी वेगवेगळ्या तऱ्हेने स्वतःला व्यक्त करत जाईल. आणि व्यक्त करता करताच तिला बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या शाखांमधला स्वतःचा अनुबंध मिळत जाईल. बुद्धीचे अनेक दिशांनी जाणारे पंख असतात.ते छाटू नका. त्यांना वाढू द्या.. त्यांची एकमेकांमधली गुंफण त्या त्या व्यक्तीला उमजेल.. ती स्पेस त्या व्यक्तीला द्या.

       अनुभव घेऊया… करून तरी बघू एकदा… असा दृष्टिकोन ठेवा… आणि स्वतःची बहुरंगी बुद्धी फुलवा…. 

छाटू नका पंख मुलांचे.. बहरू द्या . त्यांना फुलू द्या..

 

शब्दांकन
वैनायकी दीपंकर कुलकर्णी
कोल्हापुर 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!