चंदूर /ता : २२ अशोक पाटील
चंदूर मधील शाहूनगर गल्ली नं ९ येथील ३५ वर्षीय तरुणास कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले.या तरुणाच्या कुटुंबातील पाच जणांना व तीव्र संपर्कातील खाजगी डॉक्टरसह चार मित्रांना असे एकूण १० जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत. गावात हा दूसरा रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कोरोना बाधित रूग्ण राहत असलेला ३०० मिटरचा परिसर सील करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील चंदूर मधील तरुण गेले दोन दिवसापासून आजारी असल्याने तेथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. प्रकृती आणखी खालविल्याने त्यास इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यावेळी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. मंगळवारी याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याला कोरोना संसर्ग कोठून झाला .याचा शोध स्थानिक प्रशासन घेत आहे. चंदूर ग्रामसमिती मार्फत या भागामध्ये निर्जतुकीकरण औषध फवारणी करण्यात येत आहे.