पाटण / ताः १४ – प्रतिनिधी
कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 41389 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणात आता एकूण पाणीसाठा 82.75 टि. एम. सि. पाणीसाठा झाला आहे. तर हवामान खात्याने अति पावसाचा इशारा दिला आहे . त्यामुळे धरणाची एकूण पाणी साठवण व सध्या पाणी सामावून घेण्याची क्षमता विचारात घेऊन धरण परिचालन सुचीप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स तर दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे 9 इंचांनी वर उचलून त्यातून प्रतिसेकंद विनावापर 3700 क्युसेक्स असे एकूण 5800 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. या सोडलेल्या पाण्यासह पूर्वेकडे सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पूर्वेकडे मोठा पाऊस नसल्याने नदीपात्रात ज्यादा पाणी सामावून घेण्याची क्षमता असल्याने पूराचा धोका निर्माण होणार नाही . याचीही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली .