कोरोना बाधित रुग्णांच्या स्वखर्चाने हॉटेल सुविधा उपलब्ध करून देणार -प्रांताधिकारी डॉ .विकास खरात

इचलकरंजी /ताः २८

         कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असलेने शासन निर्देशानुसार इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेत येत आहेत. त्याचबरोबर शहरातील डी.के.टी.ई. होस्टेल, मुसळे हायस्कूल, अल्फोन्सा व व्यंकटेश्वरा स्कूल या चार ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने कोव्हीड केअर सेंटर उपचारासाठी कार्यान्वित करणेत आलेली आहेत. या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सतेज पाटील यांनी दि. २५ जुलै रोजीच्या इचलकरंजी भेटी प्रसंगी आर्थिक क्षमता असणाऱ्या कोरोना बाधीत रुग्णांच्या करिता हॉटेल अथवा लॉज मध्ये राहून चांगले उपचार खाजगी वैद्यकीय व्यवसायांच्या सहकार्याने मिळवून देण्यासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करावेत असे निर्देश दिले होते.

           त्यानुसार इचलकरंजी नगर परिषदेने शहरातील वैद्यकीय व्यवसायिक व हॉटेल व्यवसायिक यांची नगरपरिषदेमार्फत मागील दोन दिवसापासून वारंवार बैठका घेतल्या आहेत. त्यांच्या सहकार्याने हॉटेल व लॉज मध्येच बाधित रुग्णांना स्वखर्चाने राहण्याची व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणेत येणार आहे. याकरिता शहरातील महेश सेवा समिती व पाच हॉटेल व लॉज चा समावेश करणेत आलेला आहे. या सर्व ठिकाणी अलायन्स हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, सेवाभारतीचे डॉ. हेगडेवार रुग्णालय आणि इचलकरंजी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन हे सदर रुग्णांच्यावर हॉटेल मध्येच आवश्यक उपचार करणार आहेत. या साठी येणारा खर्च (वैद्यकीय सेवा / हॉटेल सेवा) रुग्णांनी संबधितांना परस्पर रुग्णांनी आहे. यामध्ये नगरपरिषद प्रशासनाचा सहभाग समन्वयाचा असून राहण्यासाठी रु. दहा हजार ते पंचवीस हजार रू . पर्यंत सेवा शुल्क व वैद्यकीय उपचारासाठी वीस हजार रु . ते पंचवीस हजार रु. असा खर्च निश्चित करणेत आलेला आहे. हा खर्च पूर्ण 10 दिवसासाठी असून या मध्ये राहणे, नाश्ता, जेवण, वैद्यकीय उपचार यांचा समावेश असेल. प्रसंगी एखाद्या रुग्णास हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज पडल्यास तो खर्च अतिरिक्त असणार आहे. ही सेवा केवळ कोणताही गंभीर आजार नसणाऱ्या 55 वर्षापेक्षा कमी वयाच्या व कोणतीही लक्षणे नसणाऱ्या बाधित रुग्णासाठी असणार आहे. तरी ज्या बाधित रुग्णांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी नगरपरिषदेकडुन यासाठी नियुक्त करणेत आलेले समन्वय अधिकारी सचिन पाटील, सहायक मिळकत पर्यवेक्षक (7276233268) यांचेशी संपर्क करावा. याबाबतची घोषणा आज मंगळवार दि. २८ जुलै रोजी उप विभागीय कार्यालय येथे इचलकरंजीचे उप विभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी केली. याप्रसंगी नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, डॉ. राजेश पोवार , शहाजी भोसले याचबरोबर महेश सेवा समितीचे सदस्य , शहरातील वैद्यकीय व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

error: Content is protected !!